Manmad Accident News: नाशिक जिल्ह्यातील मनमाडमध्ये मंगळवारी रात्री भीषण अपघाताची घटना घडली. एका भरधाव टँकरने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोन लहान मुलांसह तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर, दोन महिला आणि एक लहान मुलगा जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्रीच्या सुमारास नांदगाव मार्गांवर पानेवाडीजवळ हा अपघात घडला. एका भरधाव टँकरने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दोन लहान मुलांसह तिघांचा मृत्यू झाला. तर, दोन महिला आणि एक लहान मुलगा जखमी झाला आहे. त्यांना तातडीने मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकीचा अक्षरश: चुराडा झाला. अपघातानंतर टँकरचालक घटनास्थळावरून पसार झाला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अज्ञात ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला.
बुलढाण्यात मंगळवारी पहाटे कंटेनर आणि ट्रॅक्टर यांच्यात भीषण धडक झाली. या अपघातात ट्रॅक्टरमधील तीन मजुरांचा मृत्यू झाला आहे. तर, अनेकजण जखमी झाले आहेत. जखमींवर बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत. यातील चार जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृताच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. घटनेतील सर्व मृत आणि जखमी मजूर नांदुरा तालुक्यातील वडी गावातील रहिवासी आहेत. हे सर्वजण आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी मजुरी करतात. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात कंटेनरचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पुणे-सोलापूर महामार्गावर राज्य परिवहनच्या दोन बसमध्ये भीषण धडक झाली. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ६४ जण जखमी झाले. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोमवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. अचानक समोर आलेल्या दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात एसटी बस दुभाजकाला धडकून समोरून येणाऱ्या बसला धडकली. या अपघातात दोन्ही बसचे प्रचंड नुकसान झाले आहे. मृतांची नावे अद्याप समजू शकलेले नसून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
संबंधित बातम्या