Pune Haveli accident : पुण्यात अपघाताच्या घटना वाढत चालल्या आहेत. या घटना थांबण्याचे नाव घेत नाही आहे. शुक्रवारी हवेली तालुक्यातील अष्टापूर फाटा परिसरात एका भरधाव दुचाकीने समोरून येणाऱ्या दुचाकीला समोरा समोर जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन दुचाकीस्वारांसह एका ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
प्रवीण सुनील पाटोळे (वय २८), राजवीर प्रवीण पाटोळे (वय ६ दोघे रा. अष्टापूर, ता. हवेली, नगर रस्ता ) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. तर दूसरा दुचाकीस्वार यश शेखावत (वय २१ रा. न्हावी सांडस फाटा, ता. हवेली, नगर रस्ता) हा गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यू झाला. मृत शेखावत वर या अपघात प्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अक्षय पाटोळे (वय २९ ) यांनी तक्रार दाखल केली आहे.
दुचाकीस्वार प्रवीण व त्यांचा मुलगा राजवीर हे शुक्रवारी (३१ मे) संध्याकाळी ८ च्या सुमारास घरी जात होते. यावेळी यवत परिसरातील राहू येथून अष्टापूरकडे भरधाव वेगाने यश शेखावत हा त्यांच्या दुचाकीवरून येत होता. यावेळी शेखावतने समोरुन दुचाकीवरुण येणाऱ्या प्रवीण यांना जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा गंभीर होता की, प्रवीण व त्यांचा मुलगा राजवीर हे गंभीर जखमी झाले. तर दुचाकीस्वार शेखावत देखील गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तिघांनाही दवाखान्यात भरती करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच प्रवीण आणि त्यांचा मुलगा राजवीर यांचा मृत्यू झाला होता. तर शेखावतचा देखील उपचार सुरू असतांना मृत्यू झाला.
या अपघातात प्रवीण आणि त्यांचा सहा वर्षांचा मुलगा राजवीर यांचा मृत्यू झाला. दोघांच्या मृत्यूमुळे अष्टापूर परिसरात शोककळा पसरली आहे.