Mumbai Water Supply News : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये वरुणराजाचं पुनरागमन झालं आहे. त्यामुळं शेतकऱ्यांसह सामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गुरुवारी रात्री पासून मुंबईत होत असलेल्या पावसाने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण आता मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारे तीन धरणं १०० टक्क्यांनी भरल्याची माहिती समोर आली आहे. तलावक्षेत्रात १०० मिमी पेक्षा अधिक पाऊस झाल्याने मुंबईकरांवरील पाणीकपात टळणार आहे. वैतरणा धरणाची पाणीपातळी झपाट्याने वाढत असल्याने धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे. सध्या धरणाच्या पाच दरवाजातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
गुरुवारी रात्री उशिरा पासून मुंबईसह ठाणे आणि पालघरमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली. जोरदार पाऊस होत असल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. तानसा, तुळशी आणि विहार हे तलाव १०० टक्के भरले असून त्यातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. याशिवाय अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या धरणांच्या पाणीपातळीत मोठी वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळं आता मुंबई महापालिकेकडून शहरातील पाणीकपात कमी केली जाणार असल्याची माहिती आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात मुंबईत पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर तब्बल दीड महिन्यानंतर मुंबईत वरुणराजा बरसला आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांची १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर इतका पाणीसाठी आहे. सध्या या सातही धरणांमध्ये १३ लाख ४८ हजार दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा झाला आहे. आणखी दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाने हजेरी लावल्यास मुंबईतील अन्य धरणं देखील पूर्णपणे भरू शकतात. त्यामुळं आता धरणं भरल्याने मुंबईकरांच्या पाण्याच्या प्रश्न निकाली लागला आहे. येत्या काही दिवसांत मुंबई महापालिकेकडून शहरात पाणीकपात होण्याची शक्यता आहे. मुंबईसह ठाणे, पालघर, नवी मुंबई आणि कोकणात होत असलेल्या पावसामुळं अनेक नदी आणि नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळं नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
संबंधित बातम्या