Pune Hadapasar crime : पुण्यातील हडपसर येथील एका शाळेत काही मुलांनी मोबईल अॅपचा वापर करून वर्गातील मुलींचे नग्न फोटो तयार करून ते इतर मित्रांना इन्स्टाग्राम अकाऊंटवर पाठवून मुलींची बदनामी केली. या घटनेने खळबळ उडाली आहे. सर्व मुले ही अल्पवयीन आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी मुलांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलींपैकी एका मुलीच्या आईने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार अल्पवयीन आरोपींविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा व माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या महितीनुसार हे सर्व आरोपी हडपसर परिसरातील एका शाळेत दहावीत शिकतात. पीडित मुली त्यांच्याच वर्गातील आहेत. आरोपींनी मोबाइलमध्ये बोल्ट नावाच्या अॅपचा वापर करत वर्गातील तीन मुलींचे फोटो मॉर्फ केले. तसेच त्यांचे हे फोटो त्यांनी त्यांच्या इतर मित्रांना सोशल मिडियावरून पाठवले. स्वातंत्र्यदिनानिमित्त शाळेमध्ये ध्वजारोहण करण्यासाठी पिडीत मुली या सकाळी साडेसात वाजता गेल्या.
यावेळी शाळेतील एका शिक्षिकेने मुलीच्या आईला फोन करून शाळेत बोलावून घेत त्यांच्या मुलीसह तिच्या अन्य तीन मैत्रिणींचे नग्न फोटो तयार करून ते शाळेतल्या मुलांनी इन्स्टाग्रामवर एकमेकांना पाठवल्याची माहिती दिली. यानंतर पालक शाळेत आले. त्यांनी शिक्षिकेची भेट घेतली व सर्व प्रकार समून घेत थेट पोलिस ठाण्यात तक्रार केली.
पोलिसांनी देखील या घटनेची दखल घेत तपास सुरू केला. तपासात सय्यदनगर येथे राहणाऱ्या एका १६ वर्षीय मुलाने इन्स्टाग्रामवरून हे फोटो त्याच्या मित्रांना पाठवल्याचे निष्पन्न झाले. त्याने आणखी तीन मुलींचे फोटो हे रामटेकडी व हांडेवाडी येथे राहणाऱ्या आरोपींना पाठवले. दरम्यान, पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन या बाबत चौकशी केली असता, त्याने हे फोटो १६ जून आणि १७ जूनला त्याच्या मोबाईलच्या ‘टेलिग्रॅम बॉट’ या अॅपवरून बनवल्याचे सांगितले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी मुलांची रवानगी ही बालसुधारगृहात करण्यात आली आहे. पुढील तपास हडपसर पोलिस करत आहेत.