मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Raigad boat news : एके-४७ बंदुकांसह रायगडमध्ये आढळलेल्या बोटींचं गूढ उकललं, ‘या’ देशाशी आहे कनेक्शन

Raigad boat news : एके-४७ बंदुकांसह रायगडमध्ये आढळलेल्या बोटींचं गूढ उकललं, ‘या’ देशाशी आहे कनेक्शन

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Aug 18, 2022 04:43 PM IST

suspicious Boat found in Shrivardhan Raigad: जप्त करण्यात आलेल्या बोटीचं नाव लेडिहान असून तिची मालकी ऑस्ट्रेलियातील नागरिक हाना लॉंडर्सची आहे, तिचे पती जेम्स हार्वर्ड सदर बोटीचे कप्तान असून ही बोट मस्कतहून यूरोपकडे जाणार होती, अशी माहिती समोर आली आहे.

Shrivardhan Raigad Crime News In Marathi
Shrivardhan Raigad Crime News In Marathi (HT)

Shrivardhan Raigad Crime News In Marathi : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनच्या समुद्रकिनाऱ्यावर तीन एके-४७ रायफलींसह आढळलेल्या संशयास्पद बोटीचं गूढ उकललं आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत या संदर्भात सविस्तर निवेदन केलं आहे. त्याचबरोबर केंद्रीय तपास यंत्रणांशी संपर्क साधून राज्यातील यंत्रणांनाही सतर्क करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

श्रीवर्धनमध्ये हरिहरेश्वर आणि भरडखोलच्या समुद्रकिनाऱ्यालगत दोन संशयास्पद बोटी आढळून आल्यामुळं खळबळ उडाली होती. त्यातील एका बोटीत तीन एके-४७ रायफली व जिवंत काडतुसे होती. पोलिसांनी ही शस्त्रे जप्त केली आहेत. त्याचबरोबर भरडखोलच्या समुद्रकिनाऱ्यावर लाइफ जॅकेट आणि इतर साहित्य सापडलं. श्रीवर्धनच्या आमदार आदिती तटकरे यांनी विधानसभेत लगेचच ही माहिती देत राज्य सरकारनं यावर खुलासा करण्याची मागणी केली होती. त्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली.

'ती बोट ऑस्ट्रेलियाची'

फडणवीस यांनी भारतीय तटरक्षक दलाकडून मिळालेली माहिती सभागृहाला दिली. त्यानुसार, 'सदर बोटीचं नाव लेडिहान असून ही बोट ऑस्ट्रेलियन नागरिक असलेल्या हाना लॉंडर्सची आहे. तिचे पती जेम्स हार्वर्ड या बोटीचे कप्तान आहेत. ही बोट मस्कतहून यूरोपकडे जाणार होती. दिनांक २६ जुलैला सकाळी ११ वाजता या बोटीचं इंजिन निकामी झालं. त्यानंतर खलाशांनी त्यांना मदतीसाठी कॉल दिला. त्यानंतर एका कोरियन युद्धनौकेनं या बोटीतील प्रवाशांची सुटका करत त्यांना ओमानला सुपूर्द केलं. समुद्र खवळलेला असल्यानं पाण्याच्या प्रवाहात लेडिहान ही बोट भरकटत हरिहरेश्वरच्या किनाऱ्यापर्यंत आली, असं फडणवीस म्हणाले.

पोलीस यंत्रणा अलर्टवर- फडणवीस

सदर घटनेचा तपास स्थानिक पोलीस आणि दहशतवाद विरोधी पथक करत असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं. 'आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर सर्व पोलीस यंत्रणांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. आम्ही भारतीय तटरक्षक दल आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्या संपर्कात असून बारकाईनं पुढील तपास करण्यात येत आहे. तपासात कुठलीही त्रुटी राहू नये म्हणून नाकाबंदी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सणासुदीचे दिवस असल्यानं कुठंही काही घडणार नाही, याकडंही लक्ष देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. याशिवाय केंद्रीय तपास यंत्रणा या संपर्कात असून आता या माहितीचं शहानिशा केली जात असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.

WhatsApp channel

संबंधित बातम्या