मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी’च्या तिसऱ्या टप्प्याचे सोमवारी लोकार्पण, आता मुंबई ते शिर्डी प्रवास होणार वेगवान!

Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी’च्या तिसऱ्या टप्प्याचे सोमवारी लोकार्पण, आता मुंबई ते शिर्डी प्रवास होणार वेगवान!

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 03, 2024 07:36 PM IST

Samruddhi Mahamarg Third phase Inauguration : समृद्धी महामार्गाच्या भरवीर ते इगतपुरी दरम्यानच्या २३ किलोमीटर लांबीच्या तिसऱ्या टप्प्याचं उद्घाटनसोमवारी होत असून यामुळे नागपूरहून इगतपुरीपर्यंतचा मार्ग यामुळे खुला झाला आहे.

समृद्धी महामार्गावरील भरवीर ते इगतपुरी दरम्यानच्या तिसऱ्या टप्प्याचं सोमवारी उद्घाटन
समृद्धी महामार्गावरील भरवीर ते इगतपुरी दरम्यानच्या तिसऱ्या टप्प्याचं सोमवारी उद्घाटन

मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाच्या दोन टप्प्याचे उद्घाटन झाले असून आता भरवीर ते इगतपुरी या तिसऱ्या टप्प्याच्या लोकार्पणाचा मुहूर्त ठरला आहे. सोमवारी (४ मार्च) हा टप्पा वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. या टप्पा वाहतुकीसाठी खुला केल्यानंतर समृद्धी महामार्गाने नागपूरहून येणाऱ्या वाहनांना थेट इगतपुरीपर्यंत पोहोचणे शक्य होणार आहे. त्यानंतर  इगतपुरी इंटरचेंजचा वापर करून ठाणे, मुंबई परिसरातून शिर्डीचा प्रवाश वेगवान होणार असून आता मुंबईतून शिर्डीला अवघ्या एका तासात पोहोचता येणार आहे. त्याचबरोबर शेतीमालही जलदगतीने मुंबईला पाठवता येणार आहे. 

समृद्धी महामार्गाच्या भरवीर ते इगतपुरी या तिसऱ्या टप्प्याचं उद्घाटन सोमवारी सकाळी  ११  वाजता सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मंत्री छगन भुजबळ भूषवणार आहेत. या कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवारही उपस्थित असणार आहेत.

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग ७०१ किमी लांबीचा असून त्यातील नागपूर ते शिर्डी हा ५२० किमीचा पहिला टप्पा डिसेंबर २०२२ मध्ये सुरू करण्यात आला होता. त्यानंतर  या महामार्गाचा शिर्डी ते भरवीर हा दुसरा टप्पाही वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. ७०१ पैकी ६०० किमी मार्गावरून वाहतूक सुरू आहे. एमएसआरडीसीकडून भरवीर ते इगतपुरीदरम्यानच्या २३ किलोमीटरच्या मार्गाची कामे पूर्ण झाली असून, आता तो येत्या ४ मार्चपासून सुरू केला जात आहे. त्यामुळे हा रस्ता सुरू झाल्यानंतर नागपूरहून निघालेल्या वाहनांना विनाअथडळा द्रुतगती महामार्गाने मुंबईच्या वेशीपर्यंत पोहोचता येणार आहे. 

एमएसआरडीसीकडून इगतपुरी ते आमनेपर्यंतच्या शेवटच्या टप्प्याचीही कामे युद्धपातळीवर सुरू असून या मार्गावरील जवळपास ९० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. मात्र एका उड्डाणपुलाचे काम  सुरू आहे. हे काम पूर्ण करून हा मार्गही जुलैपर्यंत प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्यात येणार आहे. त्यातून नागपूर ते मुंबई हा संपूर्ण मार्ग खुला होईल. 

एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी सांगितले की, समृद्धी महामार्गाच्या भरवीर ते इगतपुरी या टप्प्याचे लोकार्पण ४ मार्चला होत आहे. तर उर्वरित महामार्गाची कामे जुलैपर्यंत पूर्ण करून तो वाहतुकीसाठी खुला केला जाईल.

IPL_Entry_Point

विभाग