Pune Theft Viral Video: पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. यात भुरट्या चोरच्या घटना देखील वाढल्या आहेत. अशीच एक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. एका जोडप्याला वडापाव खाणे चांगलेच महागात पडले आहे. चोरट्यांनी महिला गाडी लावत असतांना तिचं लक्ष नसल्याची संधी साधून गाडीसमोर लावलेली सोन्याची बॅग लंपास केली. तब्बल १४ लाख रुपयांचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना हडपसर येथे एका वडापावच्या गाडीसमोर घडली आहे. एक जोडपे वडापाव खाण्यासाठी थांबले असता चोराने त्यांची गाडीला लावलेली दागिन्यांची पिशवी महिलेच्या नकळत लंपास केली. या पिशवीत १९५ ग्रॅम सोन होत. आताच्या बाजारभावानुसार तब्बल १४ लाख रुपयांचं सोनं चोरट्यांनी लंपास केलं आहे.
मांजरीमध्ये राहणारे दशरथ धामणे व त्यांच्या पत्नी जयश्री धामणे यांनी बँकेत तारण ठेवलेलं १९५ ग्रॅम सोनं सोडवून आणलं होतं. सोन्याची बॅग घेऊन दोघेही घरी परत जात होते. यावेळी त्यांनी दागिन्यांची पिशवी मोपेड बाईकच्या पुढे लटकवली होती. घरी जात असतांना दोघेही नातवंडांना वडापाव घेण्यासाठी हडपसर मधील रोहित वडेवालेसमोर थांबले होते. यावेळी दशरथ धामणे वडापाव घ्यायला गेले. तर त्यांच्या पत्नी गाडीपाशी उभ्या होत्या. यावेळी धामणे यांना चोरट्यांनी तुमच्या गाडीच्या मागे पैसे पडल्याची बतावणी केली.
गाडीच्या मागे पैसे खरच पडले आहे का हे पाहण्यासाठी धामणे या खाली वाकल्या. यावेळी त्यांच्यावर लक्ष ठेऊन असलेल्या एकाने त्यांच्या गाडीवरील हुकला लटकवलेली दागिन्यांची पिशवी घेऊन पसार झाले. ही संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
धामणे यांच्याबॅगेत सोन्याच्या बांगड्या, अंगठ्या व इतर दागिने मिळून जवळजवळ १९५ ग्रॅमचे १४ लाख रुपये आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.