Mumbai Stray Cat Issue : मुंबईत नागरिकांना आतापर्यंत भटक्या कुत्र्यांचा त्रास होत होता. मात्र, आता त्यांच्या त्रासात भटक्या मांजरींची भर पडली आहे. मुंबईतील बहुतांश रस्ते, चौक, शाळा, प्रशासकीय कार्यालये, तसेच रुग्णालयांत मोठ्या प्रमाणात मांजरी वाढल्या आहेत. यामुळे येथे येणाऱ्या नागरिकांना याचा त्रास होतो आहे. काही नागरिकांवर तर मांजरींनी हल्ले देखील केले आहे. यामुळे वाढत्या मांजरींची संख्या कमी करण्यासाठी आता महानगर पालिकेने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणूंन ११ हजार मांजरींचे निर्बीजीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबईत भटकी कुत्री, मांजरी नागरिकांची डोकेदुखी ठरू लागली आहे. मांजरांची वाढती संख्या नियंत्रित करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने निर्बीजीकरण मोहीम हाती घेतली आहे. मात्र, ही प्रक्रिया आता वेगाने राबवली जाणार आहे. या मोहिमे अंतर्गत आतापर्यंत पालिकेने १८ हजार ८०८ मांजरांचे निर्बीजीकरण केले आहे. तर या चालू वर्षात तब्बल ११ हजार मांजरांचे निर्बीजीकरण करण्याचे लक्ष्य होते. हे उद्दिष्ट ४६ टक्के पूर्ण झाले असून उर्वरित उद्दिष्ट मार्च २०२५ पर्यंत पालिकेकडून पूर्ण केले जाणार आहे.
भटक्या प्राण्यांची वाढत्या संख्ये बाबत अनेक तक्रारी पालिकेला मिळाल्या होत्या. २०१८ पासून यात आणखी वाढ झाली. मुंबईतील बहुतांश ठिकाणी मांजरांचा वावर वाढला आहे. या सोबतच अनेक प्राणिप्रेमींनीही पालिकेला मांजरांच्या निर्बीजीकरण करण्याची मागणी केली होती. मांजरांच्या संख्येवर विपरीत होऊ नये यासाठी फक्त ७० टक्के निर्बीजीकरण करण्यास मान्यता दिली आहे. ही निर्बीजीकरण मोहीम वेल्फेअर ऑफ स्ट्रे डॉग, बीएसपीसीए, मुंबई व्हेटर्नरी कॉलेज, अहिंसा, इन डिफेन्स ऑफ अनिमल्स, उत्कर्ष ग्लोबल फाऊंडेशन व जीव रक्षा अॅनिमल वेल्फेअर ट्रस्टतर्फे राबवली जात आहे.
मुंबई महानगर पालिका ही मांजरांचे निर्बीजीकरण करणारी पहिली पालिका ठरली आहे. दक्षिण मुंबईत मांजरांची संख्या अधिक असून या परिसरात मांजरांचे निर्बीजीकरण मोहिमेला गती देण्यात आली आहे. आता पर्यंत ४६ टक्के मांजरांचे निर्बीजीकरण पूर्ण करण्यात आले आहे.
संबंधित बातम्या