Maharashtra FYJC Merit List 2024 : अकरावी प्रवेशाचा घोळ अद्याप संपलेला नाही. तीन नियमित आणि दोन विशेष अशा पाच फेऱ्यांनंतरही मुले प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. अकरावी केंद्रीय प्रवेश व कोटाअंतर्गत अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची आज बुधवारी (दि २१) तिसरी विशेष प्रवेश यादी ऑनलाइन पद्धतीने जाहीर होणार असून तब्बल ७ हजाराहून अधिक विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. यादीत नाव आलेल्या विद्यार्थ्यांना उद्या २२ ऑगस्टपासून सकाळी १० ते २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रवेश घेता येणार आहे.
अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी एकूण तीन लाख नऊ हजार ७२६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २ लाख ९४ हजार ८७७ विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज लॉक करत प्रत्यक्ष नोंदणी प्रक्रियेत सहभाग घेतला होता. ३ लाख विद्यार्थ्यांसाठी मुंबईतील १ हजार ४७ महाविद्यालयात ४ लाख ४ हजार ९१५ जागा उपलब्ध होत्या. प्रत्येक विद्यार्थ्याला जागा मिळूनही १ लाख ५९ हजार ९९० जागा शिल्लक होत्या. पहिल्या तीन व नंतरच्या दोन विशेष फेऱ्या होऊनही केवळ २ लाख ४४ हजार ९२५, म्हणजेच ८३ टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. केंद्रीय प्रवेश प्रक्रिया आणि कोट्यातील प्रवेश मिळून १ लाख ६० हजार ४८१ जागा रिक्त असून अर्ज केलेले एकूण ५० हजार ३१३ व दुसऱ्या विशेष फेरीत अर्ज केलेले ७ हजार ३८९ विद्यार्थी सध्या प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत.
११ वीच्या विविध शाखेच्या प्रवेश पात्रता गुणांत ४ ते ५ टक्क्यांनी घट झाली होती. सर्व जागांवर प्रवेश निश्चित झाल्यामुळे काही महाविद्यालयांनी संबंधित शाखांसाठीची विशेष प्रवेश यादी जाहीर केली नव्हती. त्यामुळे तिसऱ्या विशेष फेरीत प्रवेश पात्रता गुणांमध्ये कितपत घट होत आहे, नामांकित महाविद्यालयांची संबंधित शाखांसाठीची प्रवेश यादी जाहीर होते का, प्रवेशापासून वंचित असलेल्या हजारो विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित होऊन लांबणीवर जाऊन प्रवेश प्रक्रिया संपण्याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.
आज जाहीर होणाऱ्या यादीत द्विलक्षी विषयासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची तिसरी प्रवेश यादी कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर जाहीर होईल. विद्यार्थ्यांना गुरुवारी २२ ऑगस्टपासून २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत पात्र ठरलेल्या विषयासाठी आपला प्रवेश निश्चित करता येणार आहे.
संबंधित बातम्या