Pune viral video : पुण्यात कल्याणी नगर अपघातानंतर ड्रंकंन ड्राइवची कारवाईला वेग आला आहे. कल्याणी नगर तसेच शहरातील इतर भागात मोठ्या प्रमाणात ही कारवाई सुरू आहे. मात्र, या कारवाई दरम्यान कल्याणीनगर येथे एका व्यक्तीकडून वाहतूक पोलिसांनी चक्क पाय दाबून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. या व्हायरल व्हिडिओमुळे पुणे वाहतूक पोलिसांची चांगलीच पंचाईत झाली आहे. या प्रकरणी पुणे वाहतूक पोलीसांकडून सावरा सावर केली जात आहे.
पुण्यात कल्याणी नगर येथील पोर्शे कार अपघात प्रकरण दाबण्याच्या प्रयत्नात असल्याच्या संशयामुळे पुणे पोलिसांच्या भूमिकेवर शंका उपस्थित करण्यात आली होती. या मुळे मोठा वाद देखील झाला होता. पुणे पोलिस गुन्हेगारांना अभय देत असल्याचा आरोप देखील करण्यात येत होता. या प्रकरणी पुणे पोलिस आयुक्तांनी दोघांना निलंबित देखील केले होते. ही घटना ताजी असतांना आता पुणे पोलिसांचा आणखी एक प्रताप पुढे आला आहे. हा प्रताप सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
कल्याणीनगर अपघातानंतर पुण्यात नाकाबंदी जोरात सुरू आहे. तसेच वाहनांची तपासणी देखील सुरू आहे. शनिवारी रात्री सणसवाडी परिसरातील काही युवक हे कारमधून पुण्यात घरी जात असतांना रात्री १२.२० ला कल्याणीनगर परिसरात पोलिसांणी नाकाबंदी दरम्यान, या युवकांची गाडी अडवली. त्यांना गाडी बाजूला घेण्यास सांगितली.. यानंतर त्यांना दंड देखील ठोठावण्यात आला. दरम्यान, यानंतर या युवकापैकी एकाला बोलावून त्याच्या कडून पाय दाबून घेतले. हा प्रकार एकाने मोबाइलमध्ये कैद केला असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओची दखल माध्यमांनी देखील घेतली असून याचे वृत्त प्रसिद्ध होताच वाहतूक पोलिसांनी याबाबत स्पष्टीकरण दिले.
वाहतूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पीएसआय गोराडे (वय ५७) हे येरवडा वाहतूक विभाग अंतर्गत अॅडलॅब्स चौक, कल्याणीनगर येथे ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई करत होते. यावेळी त्यांनी सलग २ दिवस रात्री व दिवसा काम केल्यामुळे त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण हे ५५० पर्यंत वाढली होती. त्यामुळे त्यांच्या पायात क्रॅम्प आल्याने व्हिडिओत दिसणाऱ्या तरुणाने पोलीस कर्मचाऱ्यांच्या पायातील क्रॅम्प काढण्यासाठी मदत केली असल्याचा खुलासा पोलिसांनी केला आहे.
संबंधित बातम्या