Shirur murder news : पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे पाचर्णे मळा येथील घोडनदीपात्रात (दि ३१) जानेवारी आढळलेल्या एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेहाचे गूढ उलगडण्यास पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेला यश आले आहे. 'जमीन विक्री करा' म्हणून भांडण करत असल्याने सख्खा भाऊ व चुलत्याने या व्यक्तीच्या खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.
कृष्णा गोकुळ विघ्ने (वय ३२, रा. आनंदगाव, शिरूर कासार, ता. शिरूर कासार, जि. बीड) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहेत. तर अजिनाच गोकूळ विघ्ने (वय २६), पांडुरंग अर्जुन विघ्ने (वय ५०, दोघे रा. आनंद गाव, शिरूर कासार, ता. शिरूर कासार, जि. बीड), गणेश प्रभाकर नागरगोजे (वय २९, रा. एकलवाडी, ता. पाटोदा, जि. बीड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरूर येथील रामभाऊ पाचर्णे यांच्या शेताजवळ असलेल्या नदीपात्रात हात पाय बांधलेल्या अवस्थेत एक मृतदेह सापडला होता. या व्यक्तीचे खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याला नदीत टाकून देवून खून केला असावा, असा संशय पोलिसांना होता. या घटनेचा तपास करण्यासाठी पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सूचना दिल्या होत्या. त्यानुसार या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा व शिरूर पोलीसांचे पथक तपास करत होते. मृतदेह नदीपात्रातील असल्याने त्याचा चेहरा खराब झाला होता. यामुळे त्यांची ओळख पटवण्यात अडचणी येत होत्या. स्थानिक गुन्हे पथकाने मृतदेहाची ओळख पटवत त्याचे नाव हे कृष्णा विघ्ने असल्याचे निष्पन्न झाले. मृतदेह मिळून आलेल्या ठिकाणापासून लगतच्या रोडचे दोन्ही बाजूकडील सीसीटीव्ही कॅमेरा तपासणेत आले.
दरम्यान, खबऱ्याकडून पोलिसांना त्याच्या भावाने आणि चुलत्याने त्याचा खून केल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याच्या मुळ गावी बीड येथ जाऊन मृत कृष्णा विघ्ने याचा भाऊ अजिनाथ गोकूळ विघ्ने, चुलता पांडुरंग विघ्ने व गणेश नागरगोजे यांना शिरूर कासार येथे सापळा रचून अटक केली. त्यांची चौकशी केली असता, त्यांनी खून केल्याची कबुली दिली. मृत कृष्णा याला दारूचे व्यसन होते. दारू पिऊन तो 'कुटुंबात जमीन विक्री करा,' असे म्हणून सतत भांडण करत होता. त्यांच्या या भांडणाला सर्व जण कंटाळले होते. अखेर त्यांनी कृष्णा याचा खून करण्याचे ठरवले. त्यानुसार आरोपींनी त्याला मारहाण करून त्याचे हातपाय बांधून त्याचा मृतदेह हा घोड नदीत फेकून दिला.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, पोलीस अंमलदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, राजू मोमोण, अतुल डेरे, योगेश नागरगोजे, मंगेश चिगळे तसेच शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एकनाथ पाटोल, पोलीस अंमलदार अरूण उबाळे, नाथा जगताप, रघुनाथ हाळनोर, नितेश थोरात, विको यादव, सचिन भोई, संतोष साळुंखे यांनी केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक यादव करत आहेत.