अंगावर वीज पडून शेतमजूर तरुणीचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायंकाळी जळगाव जिल्ह्यातील नगाव खुर्द (ता. अमळनेर) येथे घडली.
निरगली मुका पावरा (१७) असे या ठार झालेल्या तरुणीचे नाव आहे. नगाव खुर्द येथे परराज्यातून कुटुंबासह आलेली निरगली ही रविवारी शेतात मजुरीसाठी गेली होती. रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास विजेच्या गडगडाटासह वादळाला सुरुवात झाली. त्यामुळे मजूर महिला गावाकडे परतत होत्या. त्याचवेळी मागे राहिलेल्या निरगलीवर वीज कोसळली. त्यात ती जागीच ठार झाली.
दरम्यान, जळगावमध्ये घरासमोर खेळताना लोंबकळत असलेल्या वीजवाहक तारेला स्पर्श झाल्याने शॉक बसून चिमुकलीचा मृत्यू झाला. धनवी महेंद्र बाविस्कर (वय ५, रा. निमखेडी) असे चिमुकलीचे नाव आहे. ही घटना आज (सोमवार) सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. निमखेडी गावातील दत्त मंदिराजवळ आपल्या घरासमोर खेळता-खेळता चिमुकली मृत्युमुखी पडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मुलीचे अचानक जाण्याने बाविस्कर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. महेंद्र बाविस्कर कुटूंबासह मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. निमखेडी गावातील दत्त मंदिराजवळ हे कुटूंबासह वास्तव्यास आहेत. सोमवारी सकाळी महेंद्र बाविस्कर यांची मोठी मुलगी धनवी ही शेजारच्या काही मुला-मुलींसोबत घरासमोर खेळत होती. जवळच ट्रॅक्टर उभे होते. त्या ट्रॅक्टरवर ती खेळत होती. गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्यामुळे विद्युत तारा तुटल्या होत्या व अनेक ठिकाणी लटकत होत्या. अशाच एका वीज प्रवाह असलेल्या तारेला स्पर्श झाल्याने धनवीचा जागीच मृत्यू झाला.