Asim Sarode on CJI Chandrachud : सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड हे निवृत्त होत आहेत. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महत्वाचे निर्णय दिले. तर त्यांचे काही निर्णय हे वादग्रस्त ठरले. गेल्या काही दिवसांपासून चंद्रचूड यांनी केलेल्या विधानांमुळे देखील ते चर्चेत राहिले. दरम्यान, त्यांच्या कार्यकाळावर सामाजिक करकर्ते व वकील अॅड. असीम सरोदे यांनी त्यांच्या कार्यकाळावर टीका केली आहे. सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड हे सत्ताधाऱ्यांविरुद्ध हिंमत दाखवण्यात कमजोर ठरले, असल्याचं सरोदे यांनी म्हटलं आहे.
अॅड. असीम सरोदे यांनी चंद्रचूड यांच्या निवृत्तीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या कार्यकाळाचं विश्लेषण केलं आहे. दैनिक 'सामना'मध्ये या संदर्भात वृत्त देण्यात आलं आहे. 'न्यायाधीश पदावर बसलेल्या व्यक्तीने सत्तेत असलेल्या राजकीय पक्षाच्या बाजूने वागणे अपेक्षित नाही. डॉ. चंद्रचूड यांना सरन्यायाधीश म्हणून संवैधानिक संरक्षण होते. तरीसुद्धा त्यांचं घाबरून वागणं हे अत्यंत अतार्किक होतं. त्यांनी सातत्याने अनेक राज्यांतील तसेच केंद्र सरकारविरोधात असलेल्या महत्त्वाच्या केसेस प्रलंबित ठेवलेल्या आहेत. त्यांचं हे वागणं शंकास्पद आहे, असं सरोदे यांनी म्हटलं आहे.
अॅड. असीम सरोदे म्हणाले, डॉ. चंद्रचूड यांनी न्यायाधीश म्हणून कायद्याचे राज्य (रूल ऑफ लॉ) प्रस्थापित करणं गरजेचं होतं अपेक्षित होते. मात्र ते त्यात अपयशी ठरले. 'इलेक्टोरल बॉण्ड' प्रकरणी २०१६ मध्ये केस दाखल केली होती. ही केस २०२३ पर्यंत प्रलंबित का राहिली? हे जे न्यायालयीन अपयश आहे, त्यात डॉ. चंद्रचूड सहभागी आहेत. प्रशांत भूषण यांनी 'इलेक्टोरल बॉण्ड' वापरणाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याबाबत निर्देश देण्याची मागणी केली होती. त्यावर डॉ. चंद्रचूड यांनी त्यांची मागणी फेटाळली होती. एकूणच डॉ. चंद्रचूड यांचे -भाषण व वर्तन यात खूप तफावत आहे. न्यायाधीशांचा कार्यकाळ लक्षात ठेवण्यासारखा असतो. कारण त्यांनी न्यायाच्या प्रक्रियेला आकार दिलेला असतो. मात्र डॉ. चंद्रचूड यांचा कार्यकाळ जेवढ्या लवकर विसरून जाऊ तेवढे बरे, असेही अॅड. असीम सरोदे म्हणाले.