Central Railway : मुंबई मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक संपला; ६३ तासानंतर प्लॅटफॉर्म रुंदीकरणाचं काम पूर्ण!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Central Railway : मुंबई मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक संपला; ६३ तासानंतर प्लॅटफॉर्म रुंदीकरणाचं काम पूर्ण!

Central Railway : मुंबई मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक संपला; ६३ तासानंतर प्लॅटफॉर्म रुंदीकरणाचं काम पूर्ण!

Jun 02, 2024 07:32 PM IST

Central Railway Mega Block: मुंबई मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक अखेर संपुष्टात आला आहे. मात्र, मागील तीन दिवसांत मुंबईकरांना वाहतुकीच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले.

मध्य रेल्वेने ठाण्यातील प्लॅटफॉर्म रुंदीकरणाचे काम पूर्ण झाल्याची माहिती दिली.
मध्य रेल्वेने ठाण्यातील प्लॅटफॉर्म रुंदीकरणाचे काम पूर्ण झाल्याची माहिती दिली.

Mega Block News Today: ठाण्यातील प्लॅटफॉर्म क्रमांक ५ आणि ६ च्या रुंदीकरणाचे काम पूर्ण झाल्याची माहिती मध्य रेल्वेने रविवारी दिली. मध्य रेल्वेने ठाणे स्थानकातील पायाभूत सुविधांच्या अद्ययावतीकरणाच्या कामासाठी विशेष ब्लॉक घेण्यात आला होता. मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणारी मुंबई लोकल ठप्प पडल्याने सामान्य मुंबईकरांचे अतोनात हाल झाले. मध्य रेल्वेने एक्सच्या माध्यमातून मुंबईकरांचे आभार मानले.  

प्लॅटफॉर्म ५/६ चे २-३ मीटर रुंदीकरण करण्यात आले असून त्याची लांबी ५८७ मीटर आहे. मध्य रेल्वेने ठाणे रेल्वे स्थानकावर ६३ तासांचा तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ३६ तासांचा विशेष ब्लॉक सुरू केला होता. ठाणे प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसयेथे २४ डब्यांना सामावून घेण्यासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक १० आणि ११ चा विस्तार करण्याचे काम मध्य रेल्वेने यशस्वीरीत्या पूर्ण करून एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.

या प्रमुख पायाभूत सुविधांच्या सुधारणांमुळे उपनगरीय प्रवासी आणि लांब पल्ल्याच्या प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. या परिवर्तनकारी प्रयत्नात मुंबईकरांनी दिलेल्या अढळ पाठिंब्याचे आणि भावनेचे आम्ही आभारी आहोत आणि त्यांचे कौतुक करतो. मध्य रेल्वेच्या सर्व प्रवाशांच्या सेवेचा दर्जा आणखी उंचावण्यासाठी आमची बांधिलकी कायम आहे.

मध्य रेल्वेने मानले मुंबईकरांचे आभार

“धन्यवाद मुंबई! ठाणे प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे २४ डबे बसवण्यासाठी प्लॅटफॉर्म १० आणि ११ चा विस्तार करण्याचे काम अत्यंत मर्यादित वेळेत यशस्वीपणे पूर्ण करून मध्य रेल्वेने महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे”, असे मध्य रेल्वेने एक्स पोस्टद्वारे म्हटले आहे. 

मेगाब्लॉकदरम्यान तब्बल ९३५ गाड्या रद्द

३०-३१ मे रोजी मध्यरात्री (गुरुवार-शुक्रवार रात्री) मेगाब्लॉक सुरू झाला. प्लॅटफॉर्म रुंदीकरण प्रकल्पात ७५० प्री-कास्ट होलो ब्लॉकचा वापर करण्यात आला. त्यासाठी ४०० कामगार, २० पथके आणि १० कंत्राटदारांचा समन्वय आवश्यक आहे, असे मध्य रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. ६३ तासांच्या कालावधीत तब्बल ९३५ गाड्या रद्द करण्यात आल्या.

 

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर