Thane Murder News: ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे विवाहबाह्य संबंधातून पतीची हत्या केल्याप्रकरणी एका महिलेला आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. आरोपी महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीवर धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह सुटकेसमध्ये जवळच्या खाडीत फेकून दिला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बलराम मिश्रा असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मृत बलराम उर्फ शेखर आणि त्याची पत्नी मूळचे उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथील कुहिदिया गावातील आहेत. लग्नानंतर ते दोघे भिवंडीतील कशेळी येथील रेती बंदर रोड येथील ओम साई अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावर राहत होते. आरोपी अनुभव पांडे हा देखील त्याच अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये भाडेकरू म्हणून राहत होता. अनुभव पांडे आणि बलराम पांडे हे दोघेही उत्तर प्रदेशातील असल्याने त्यांच्यात जवळीक निर्माण झाली. काही दिवसानंतर अनुभव पांडेचे बलराम यांच्या पत्नीशी प्रेमसंबंध निर्माण झाले.
या प्रेमसंबंधात अडथळा निर्माण होत असल्याने आरोपी महिला आणि तिचा प्रियकर अनुभव पांडेने बलराम याच्या हत्येचा कट रचला. ठरल्याप्रमाणे, ७ ऑगस्ट रोजी सकाळी त्यांनी बलरामची घरात धारदार शस्त्राने हत्या केली आणि त्याचा मृतदेह एका सुटकेसमध्ये टाकून कशेळी परिसरातील एका खाडीत टाकून दिला. दुसऱ्या दिवशी पीडितेच्या नातेवाईकाने नारपोली पोलिस ठाण्यात बलराम बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले, ज्यात मृताची पत्नी आणि अनुभव एकत्र दिसून आले. यामुळे पोलिसांना त्यांच्यावर संशय आला. पोलिसांनी त्यांचे मोबाईल लोकेशन ट्रेस करून त्यांना लखनौ येथून अटक केली आणि मुंबईत आणले. अटकेनंतर आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.
याप्रकरणी आरोपीविरोधात कलम १०३ (१) आणि २३८, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.अनुभव पांडेला २९ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. मृताचा मृतदेह शोधण्यासाठी कशेळी खाडीत शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी नारपोली पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मानखुर्द परिसरात एका अनोळखी महिलेचा अर्धवट कुजलेल्या अवस्थेत मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळलेल्या अवस्थेत आढळल्यानंतर ट्रॉम्बे पोलिसांनी खुनाचा छडा लावत तिचा पती, दोन मेहुणे, सासू आणि पतीच्या बहिणीला ताब्यात घेतले आहे. महिलेच्या हत्येचे प्राथमिक कारण कौटुंबिक वाद असून नातेवाइकांमध्ये तिची हत्या कोणी केली याचा तपास केला जात आहे, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. आम्ही त्यांची चौकशी करत आहोत आणि लवकरच गोष्टी स्पष्ट होतील. शुक्रवारी सकाळी मानखुर्द परिसरात मृतदेह आढळून आला असून तीन-चार दिवसांपूर्वी तिची हत्या करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.