Dogs Attack Women In Thane: ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा येथे शुक्रवारी (७ डिसेंबर २०२४) रात्री चार भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात एक महिला गंभीर जखमी झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालेल्या कुत्र्याच्या हल्ल्याची धक्कादायक घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या घटनेने परिसरात भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. या भटक्या कुत्र्यांपासून परिसरातील लहान मुलांना धोका असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ टिटवाळा येथील एका हाऊसिंग सोसायटीजवळील आहे. व्हिडिओत चार भटकी कुत्रे एकामागून एक महिलेवर हल्ला करत आहेत. तर, संबंधित महिला स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, ती अपयशी ठरली. भटक्या कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला करत काही मीटरपर्यंत फरफटत नेले. काही वेळाने सुरक्षारक्षक व इतरांनी घटनास्थळी धाव घेत महिलेला कुत्र्यांपासून वाचवले. परंतु, या घटनेत महिला गंभीर जखमी झाल्याचे दिसत आहे. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिकांनी महिलेला जवळच्या रुग्णालयात दाखल केले, जिथे डॉक्टरांनी तिला उल्हासनगरच्या सेंट्रल हॉस्पिटलमध्ये रेफर केले. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात महिलेच्या डोक्याला, पायाला, हाताला गंभीर दुखापत झाल्याने तिला छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात हलवण्यात आले. नंतर तिला पुढील उपचारासाठी जेजे रुग्णालयात पाठवण्यात आले.
गोवली शासकीय रुग्णालयातील डॉ. दीपलक्ष्मी कांबळे यांनी सांगितले की, शुक्रवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास काही लोक कुत्र्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेला रुग्णालयात घेऊन आले. यानंतर तिच्यावर प्राथमिक उपचार करून तिला सेंट्रल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले.
टिटवाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांनी टीटवाळा परिसरात भटक्या कुत्र्यांनी महिलेवर हल्ला केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. महिलेचे नाव सांगू न शकल्याने तिची ओळख अद्याप पटलेली नाही. सध्या महिलेवर जेजे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
संबंधित बातम्या