Thane Grand Central Park : ‘तलावांचं शहर’ अशी ओळख असलेल्या ठाण्याला लवकरच नवी ओळख मिळणार आहे. ठाण्यातील कोलशेत भागात भव्य सेंट्रल पार्क विकसित करण्यात आलं असून येत्या ८ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या पार्कचं लोकार्पण करण्यात येणार आहे.
न्यूयॉर्कमधील प्रतिष्ठित ग्रँड सेंट्रल पार्क आणि लंडनच्या हायड पार्कपासून प्रेरणा घेऊन ठाणे महापालिकेनं भूखंड विकास प्रकल्पांतर्गत ग्रँड सेंट्रल पार्क विकसित केलं आहे. कोलशेतमध्ये २०.५ एकर जागेवर हे सेंट्रल पार्क उभं राहिलं आहे. ‘कल्पतरू’ या खासगी विकासकानं विकास हक्क हस्तांतरणाच्या (TDR) बदल्यात उद्यानाचा आराखडा तयार करून त्याचा विकास केला आहे. आता ही जागा पालिकेकडं सुपूर्द करण्यात आली आहे.
ग्रँड सेंट्रल पार्कमध्ये ३,५०० पेक्षा जास्त विविध प्रजातींची झाडे आहेत आणि पर्यटकांना अविस्मरणीय अनुभव देणाऱ्या अनेक सोयीसुविधांनी हे पार्क सुसज्ज आहे. या उद्यानात मुघल गार्डन, चायनीज पार्क, मोरोक्कोची संस्कृती दर्शवणारे मोरोक्कन पार्क आणि जपानी पार्क अशी चार थीम असलेली उद्यानं आहेत. फिटनेसप्रेमींसाठी या उद्यानात जॉगिंग ट्रॅक, देशातील सर्वात मोठे स्केटिंग यार्ड, लॉन टेनिस आणि व्हॉलीबॉलसाठी कोर्ट, मुलांसाठी खेळाची साधने, योग आणि ध्यानासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध आहेत,' अशी माहिती अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिली.
उद्यानातील जलस्त्रोतांमध्ये वैविध्यपूर्ण पक्ष्यांची गर्दी होत असल्यानं पक्षी निरीक्षकांसाठी ही पर्वणी ठरणार आहे. ठाण्यात सुमारे ८० हून अधिक विकसित उद्यानं असून त्यापैकी हे सर्वात मोठं उद्यानं असेल, अशी माहिती महापालिका उपायुक्त मिताली संचेती यांनी दिली. मानपाडा येथील निळकंठ वुड्सजवळच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून दोन एकरवर फुलपाखरू उद्यानही आहे. त्याचंही व्यवस्थापन महापालिकेतर्फे केलं जातं.
ठाण्यातील सेंट्रल पार्कमध्ये पर्यटकांना प्रवेश शुल्क द्यावं लागणार का हे समजू शकलेलं नाही. याबाबत विचारलं असता येत्या दोन दिवसांत होणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात येईल, असं अधिकाऱ्यांनी 'हिंदुस्तान टाइम्स'ला सांगितलं.
संबंधित बातम्या