Kalwa Building Slabs Collapes: ठाण्यातील कळवा येथे एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या रहिवाशींच्या अंगावर छत कोसळल्याची घटना घडली. या घटनेत वृद्ध दाम्पत्य आणि त्यांचा मुलगा जखमी झाला. जखमींना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.
मिळालेल्या माहितीनुसार, कळव्यातील भुसार अली भागात असलेल्या ओम कृष्ण सहकारी गृहनिर्माण संस्थेत बुधवारी रात्री ११.५५ च्या सुमारास दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅटचे छत कोसळले. या घटनेत वृद्ध दाम्पत्य आणि त्यांचा मुलगा जखमी झाला. जखमींना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले, अशी माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाने विभागीय प्रमुख यासिन तडवी यांनी दिली.
ही इमारत सुमारे ३५ वर्षे जुनी आहे आणि धोकादायक स्थितीत आहे. या इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांना आधीच सूचना देण्यात आल्या आहेत. या घटनेनंतर इमारतीतील ३० प्लॅटमध्ये राहणाऱ्या सुमारे १०० रहिवाशांना सुखरूप बाहेर काढले. मनोहर दांडेकर (वय,७०), त्यांची पत्नी मनीषा (वय, ६५) आणि मुलगा मयूर (वय, ४०) अशी जखमींची नावे आहेत. या घटनेनंतर इमारत सील करण्यात आली. या इमारतीबाबत पुढील कारवाईचा निर्णय पालिका अधिकारी घेतील, असेही तडवी यांनी सांगितले आहे.
नागपूरच्या अंबाझरी येथे वाढदिवशीच तलावात बुडून एका विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. घरीवाढदिवस साजरा केल्यानंतर मित्रांना पार्टी देण्यासाठी अंबाझरी तलावावर गेला असता ही घटना घडली. ही घटना मंगळवारी घडली. पुलकित राज शहदादपुरी (वय, १६) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. तो इयत्ता अकरावीत शिकत होता. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन जवानांच्या मदतीने पुलकितचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. शवविच्छेदनानंतर मुलाचे मृतदेह कुटुंबीयांना सोपवण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील चौकशीला सुरुवात केली. वाढदिवशीच मुलाचा मृत्यू झाल्याने शहदादपुरी कुटुंबावर दुख:चे डोंगर कोसळले.
संबंधित बातम्या