Thane school and Colleges News: भारतीय हवामान खात्याने मुंबईसह ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांसाठी पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेल्या अंदाजाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना उद्या (२६ जुलै २०२४) सुट्टी जाहीर करण्यात आली, अशी माहिती ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी माहिती दिली.
ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख यासीन तडवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत शहरात ३५.५१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. शहरात झाडांच्या फांद्या कोसळण्याच्या तुरळक घटना घडल्या. गुरुवारी सकाळी ८.३० ते ०९.३० या कालावधीत शहरात २६.४२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यंदाच्या पावसाळ्यात ठाणे शहरात आतापर्यंत २२८.९३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, गेल्या वर्षी याच कालावधीत ५०.७० मिलिमीटर पाऊस झाला होता.
हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार आणि अतिवृष्टीच्या अनुषंगाने इयत्ता पहिली ते इयत्ता बारावीच्या सर्व माध्यमांच्या शालेय विद्यार्थ्यांची शाळेत ये-जा करताना गैरसोय होऊ शकते, याचा विचार करता आणि सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळांना उद्या (२६ जुलै २०२४) रोजी सुट्टी जाहीर करण्यात येत असल्याची माहिती ठाणे महानगरपालिकेने दिली.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी परिस्थितीचा आढावा घेतला आणि रायगड जिल्हाधिकाऱ्यांना परिस्थिती हाताळण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. अधिकाऱ्यांना हाय अलर्टवर ठेवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. पुण्यातील रस्त्यांवर आणि लोकांच्या घरात पाणी आहे. खडकवासला धरण आणि पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत आहे. जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त सतर्क आहेत. त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन शिंदे यांनी केले. कुर्ला आणि घाटकोपर परिसरात रेल्वे रुळांवर पाणी साचले. सध्या बंद असलेला अंधेरी भुयारी मार्ग खुला करण्याचे काम सुरू आहे. गरज नसल्यास मुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.
राज्यभरात सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि पुण्यातील पूरसदृश्य परिस्थितीवर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, आज सकाळपासून मी माझ्या कार्यालयातून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह विशेषत: मुंबई, पुणे, ठाणे, कोल्हापूर आणि सांगली मध्ये सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि पूरपरिस्थितीचा आढावा घेत आहे. सर्व जिल्ह्यांची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि जिल्हा प्रशासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांना बचाव व मदत कार्यात विलंब न लावता लवकरात लवकर लोकांना आवश्यक ती मदत पुरविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.महाराष्ट्रातील जनतेने गरज असेल तरच घराबाहेर पडावे आणि प्रवास करताना सतर्क राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
संबंधित बातम्या