येत्या सोमवारी अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या भव्य मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना होणार असून अवघा देश यामुळे राममय झाला आहे. महाराष्ट्रातही सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली असून सर्वांना रामाच्या दर्शनाची ओढ लागली आहे. याच भक्तीचा फायदा घेत अनेकांची फसवणूक झाल्याची घटना समोर आल्या आहेत. मोफत दर्शनाचे आमिष दाखवून सायबर गुन्ह्याच्या घटना घडल्या आहेत. त्याचबरोबर श्रीराम मंदिराला देणगीच्या नावावरही अनेकांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला असताना आता कल्याणमध्ये असाच प्रकार समोर आला आहे.
तीन भामट्यांनी ५८ वर्षीय महिलेला श्रीरामाचं दर्शन घडवून आणण्याचं आमिष दाखवून त्यांच्याकडील सुमारे अडीच लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला आहे. दर्शनाच्या नावावर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने पोलीस ठाण्यात गाठून तक्रार नोंदवली आहे. महात्मा फुले पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा नोंद असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार महिला बुधवारी दुपारी खडकपाडा भागातून चालत जात होती. यावेळी तीन तरुणांनी त्यांना अडवले व आपण रामभक्त असून तुम्हाला प्रभू रामचंद्रांचे दर्शन घडवून आणतो, असे सांगितले. यासाठी तुम्ही तुमच्या अंगावरील सोन्याचे दागिने पिशवीत गुंडाळून ठेवा असे सांगितले. महिलेने राम दर्शनाच्या मोहापायी त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन हातातील सोन्याच्या बांगड्या व अन्य दागिने असा जवळपास २ लाख ६६ हजाराचा ऐवज पिशवीत ठेवला.
पिशवीतील दागिने कोणी चोरी नये, असे सांगून भामट्यांनी ती पिशवी आपल्याकडे घेतली. रामाचे दर्शन मिळण्याच्या आनंदात असणाऱ्या महिलेला गुंगारा देऊन तिघांनी तेथून पळ काढला. फसवणूक झाल्याचे कळताच महिलेने पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.