Murbad Crime news : पुरोगामी राज्याला लाजवेल अशी एक घटना मुरबाड तालुक्यात उघडकीस आली आहे. जादूटोणा आणि करणी केल्याच्या संशयावरून एका ७५ वर्षांच्या वृद्धाला मारहाण करत त्याला अमानुषपणे आगीवर नाचवण्यात आले. ही घटना केरवेळे येथे घडली आहे. या प्रकरणी वृद्ध व्यक्तीच्या मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लक्ष्मण भावार्थे (वय ७५) असे या वृद्ध व्यक्तीचे नाव आहे. ते या प्रकारात जखमी झाले आहेत. त्यांच्या मुलीने दिलेल्या तक्रारीवरून गावातील नऊ व्यक्तींविरुद्ध मुरबाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुरबाडच्या केरवेळे गावात जागरण गोंधळाचा कार्यक्रम सुरू होता. हा कार्यक्रम सुरू असतांना काही जण थेट लक्ष्मण भावार्थे यांच्या घरात घुसले. त्यांनी लक्ष्मण भावार्थे यांना ओढूत कार्यक्रमाच्या ठिकाणी आणले. यावेळी त्यांना विवस्त्र करण्यात आले.
त्यांनी जादूटोणा आणि करणी केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. यावेळी त्यांना काठीने मारहाण करण्यात आली आणि त्यांना जबरदस्तीने आगीवर नाचायला लावले. ही घटना काही जणांनी मोबाइलमध्ये शूट केली. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आहे. काही जणांनी भावार्थे यांना पाडले. यात भावार्थे जखमी झाले आहेत. त्याचे पाय जळाले असून मोठ्या जखमा झाल्या आहेत. एवढेच नाही तर त्यांच्या पाठीवरही भाजले आहे.
दरम्यान, या प्रकरणी भावार्थे यांच्या मुलीने पोलीसांत धाव घेतली. मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार ९ जणांविरुद्ध मुरबाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.