मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ठाण्यात आश्रम शाळेतील १०९ विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा; १० विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर

ठाण्यात आश्रम शाळेतील १०९ विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा; १० विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर

Jan 31, 2024 11:50 PM IST

Student Food Poisoning : शहापूर तालुक्यातील भातसई येथील आश्रमशाळेतील मुलांना उत्तरकार्यातील जेवण दिल्याने १०७ मुलांना विषबाधा झाली आहे. त्यातील १० मुलांची प्रकृती चिंताजनक बनली आहे.

Student Food Poisoning
Student Food Poisoning

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील भातसई येथील गाडगे महाराज प्राथमिक आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. येथील १०९ विद्यार्थ्यांना दुपारच्या जेवणातून विषबाधा झाली. या शाळेत एकूण २७० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, यातल्या १०९ मुलांना उलट्या व मळमळीचा त्रास सुरू झाल्याने त्यांना शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

शहापूर तालुक्यातील आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या भातसई येथील संत गाडगेबाबा आश्रम शाळेत विद्यार्थ्यांना वर्षश्राद्धाच्या अन्नातून विषबाधा झाल्याचे बोलले जात आहे. आदिवासी मुला मुलींना शिक्षित करण्याचं काम या आश्रमशाळेद्वारे केले जाते. तसेच यावर प्रशासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी दिला जातो. मात्र आश्रम शाळेत बाहेरून अन्न देऊन मुलांच्या आरोग्यास धोका निर्माण केल्याचे प्रकार होत असतात.

ग्रामस्थांनी सांगितले की, वर्ष श्राद्धाचा कार्यक्रमाचे जेवण आश्रम शाळेतल्या मुलांना दिलं गेलं. ग्रामस्थांनी ज्या कॅटरर्सला जेवणाची ऑर्डर दिली त्यांनी ते परस्पर बाहेर बनवून घेतलं आणि आश्रम शाळेतल्या मुलांना दिलं. हेच जेवण विद्यार्थ्यांना दुपारी देण्यात आलं आणि त्यांना त्रास सुरू झाला. वाशिंद भागात राहणाऱ्या विकी चव्हाण यांच्या घरी वर्ष श्राद्ध असल्याने त्यांनी या आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना दुपारचे भोजन म्हणून गुलाबजाम आणि पुलाव हे अन्न पदार्थ दिले होते.हे खाताच मुलांना त्रास सुरू झाला.

ट्रेंडिंग न्यूज

या आश्रम शाळेत २७९ विद्यार्थी असून शिक्षण घेत आहेत.त्यातील १०९ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. सुरुवातीला २० ते २५ विद्यार्थ्यांना अचानक उलटी, जुलाब, मळमळ असा त्रास होत आल्याने या विद्यार्थ्यांना तातडीने शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून १० विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभाग उपचार सुरूआहेत.

विषबाधा झालेल्यांमध्ये ४६ मुलं आणि ६३ मुली आहेत. त्यांच्यावर शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यापैकी आठ ते दहा विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असून अन्यविद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.

WhatsApp channel
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर