ठाणे : ठाण्यात शुक्रवारी रात्री एकाने आपल्या पत्नीवर गोळ्या झाडून तिची हत्या केली. यानंतर त्याने देखील स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केली. ही घटना येथील कळवा येथील कुंभाळआळी येथे घडली. या घटनेने खळबळ उडाली आहे.
प्रमिला साळवी असे गोळी झाडून खून करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तर दिलीप साळवी यांनी प्रमिला यांचा खून करून स्वत: देखील आत्महत्या केली आहे. दिलीप साळवी हे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक मिलिंद साळवी यांचे बंधू, तर माजी नगरसेविका अपर्णा साळवी यांचे दीर होते.
मिळालेल्या माहितीनुसार दिलीप साळवी यांनी त्यांच्या यशवंत निवास या ठिकाणी पत्नी प्रमिला हिच्यावर त्यांच्या कडे असलेल्या बंदुकीतून गोळी झाडली. यानंतर त्यांनी देखील स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. त्यांनी हे पाऊल का उचलले या बाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. मात्र, कौटुंबिक वादातून ही घटना घडली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
या घटनेची माहिती मिळताच तात्काळ कळवा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी सदर घटनेचा तपास सुरू केला आहे. दोघांचेही मृतदेह पोस्टमोर्टमसाठी कळवा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. पोलीस उपायुक्त गणेश गावडे हे सुद्धा घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान या घटनेचे नेमके कारण काय हे चौकशी आणि तपासा नंतरच स्पष्ट होणार आहे.