मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Thane Shiv Sena: संकटकाळात शिवसेनेला साथ देणारी ठाण्यातील एकमेव नगरसेविका कोण?

Thane Shiv Sena: संकटकाळात शिवसेनेला साथ देणारी ठाण्यातील एकमेव नगरसेविका कोण?

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jul 07, 2022 02:44 PM IST

Nandini Vichare with Thane Shiv Sena: एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाण्यातील जवळपास संपूर्ण पक्ष त्यांच्यासोबत गेला असताना शिवसेनेतच राहिलेल्या एकमेव नगरसेविकेची सध्या सर्वत्र चर्चा आहे.

Nandini Vichare
Nandini Vichare

Nandini Vichare with Shiv Sena: एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना विधिमंडळ पक्षात उभी फूट पडली आणि अनेक आमदार त्यांच्यासोबत गेले. शिंदे यांनी भाजपसोबत हातमिळवणी करत मुख्यमंत्रीपद पटकावले. त्यांचं बंड यशस्वी झाल्यामुळं त्यांच्या गटाकडं जाणाऱ्यांची संख्या वाढली असून ठाण्यातील शिवसेनेच्या ६७ पैकी ६६ नगरसेवकांनी शिवसेना सोडली आहे. केवळ एक नगरसेविका शिवसेनेसोबत आहे. शिंदे यांच्या वादळातही शिवसेनेसोबत राहिलेल्या या नगरसेविकेची सध्या राज्यभरात चर्चा आहे.

एकनाथ शिंदे यांची कर्मभूमी ठाणे जिल्हा असल्यानं त्यांचं या जिल्ह्यावर वर्चस्व आहे. त्यातही ठाणे शहर हा एकनाथ शिंदे यांचा गड आहे. त्यामुळं येथील ६६ नगरसेवकांनी शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. फक्त नंदिनी विचारे या शिवसेनेसोबत राहिल्या आहेत. नंदिनी विचारे दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून ठाण्याचे शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांच्या पत्नी आहेत. राजन विचारे हे उद्धव ठाकरे यांचे विश्वासू मानले जातात. ते ठाण्याचे माजी महापौर आहेत. ठाणे शहरात त्यांची स्वत:ची देखील ताकद आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतरही ते ठामपणे शिवसेनेसोबत राहिले आहेत. त्यांच्या पत्नीनंही आता त्यांना साथ दिली आहे.

नंदिनी विचारे या २०१७ साली महापौरपदाच्या प्रबळ दावेदार होत्या. मात्र, त्यावेळी या पदानं त्यांना हुलकावणी दिली. महापालिकेची मुदत संपल्यानं तांत्रिकदृष्ट्या नंदिनी विचारे या आता माजी नगरसेविका आहेत. नंदिनी यांना आता पक्ष संघटनेत महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. राजन विचारे यांना याआधीच लोकसभेतील मुख्य प्रतोद म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. त्यांच्यावर पक्षाच्या जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी देखील येऊ शकते, अशी एक चर्चा आहे.

ठाणे महापालिकेवर गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ शिवसेनेचं वर्चस्व आहे. ‘शिवसेनेचे ठाणे’ अशीच या शहराची राजकीय ओळख होती. शिंदे यांच्या बंडामुळं या वर्चस्वाला ग्रहण लागलं आहे. आगामी निवडणुकीत शिवसेनेला शून्यापासून सुरुवात करावी लागणार आहे. अशा वेळी राजन विचारे यांची कसोटी लागणार आहे. अद्यापही काही पदाधिकारी शिवसेनेसोबत असल्याचं बोललं जातं. त्यांना शिवसेनेसोबत ठेवण्यासाठी नेमके काय प्रयत्न केले जातात, यावर बरंच काही अवलंबून असणार आहे.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या