Thane News: ठाण्यातील उल्हासनगर परिसरात रविवारी (२७ ऑक्टोबर २०२४) धक्कादायक घटना घडली. डिशवरून झालेल्या वादातून एका व्यक्तीने मित्राची हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. उल्हासनगर येथील कॅम्प तीनमधील काजल पेट्रोल पंपाजवळ ही घटना घडल्याची माहिती आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
राजा इब्राहिम शेख (वय, ४७) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर, अफरोज मोहम्मद शेख उर्फ राहुल असे आरोपी मित्राचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मयत आणि आरोपी एकमेकांचे चांगले मित्र होते. दरम्यान, रविवारी दोघेही काजल पेट्रोल पंपाजवळ जेवायला बसले. जेवताना चिकनचा एक पीस जास्त घेतला म्हणून दोघांमध्ये वाद सुरू झाला. काही क्षणातच हा वाद इतका पेटला की, रागाच्या भरात आरोपीने मृताच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवला. घटनेच्या काही वेळातच पोलिसांनी आरोपी शेखला बेड्या घातल्या. यानंतर आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
पालघर जिल्ह्यातील पेल्हार पोलिसांनी वसई येथे एका व्यक्तीने पत्नीची हत्या करून मृतदेह १२ तास फ्रीजमध्ये ठेवला. पत्नीला परिसरातील एका व्यक्तीसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर आरोपीने तिची हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. खुर्शीदा खातून चौधरी असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. तर, इस्माईल अब्दुल कयूम चौधरी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सहा महिन्यापूर्वीच त्यांचे लग्न झाले होते. खुर्शीदाचे विवाहबाह्य संबंध असल्याचे आरोपीला संशय होता. घटनेच्या दिवशी कामावर गेलेला आरोपी लंब ब्रेक घेऊन घरी परतला.परंतु, अनेकदा दरवाजा ठोठावूनही खुर्शीदा दार उघडत नव्हती. अखेर खुर्शीदाने दरवाजा उघडल्यानंतर त्याला घरात आणखी एक व्यक्ती दिसला. यामुळे संतापलेल्या आरोपीने खुर्शीदाचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर आरोपीने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी परिसरातील डॉक्टरांकडून मृत्युचे खोटे प्रमाणपत्र घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, तेथील डॉक्टरांनी त्याला स्पष्ट नकार दिला. दरम्यान शेजाऱ्यांना आरोपीच्या हालचालींवर संशय आला. त्यांनी त्वरीत पोलिसांना याबाबत माहिती दिली. यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी आरोपीच्या घराची चौकशी केली असता फ्रीजमध्ये खुर्शीदाचा मृतदेह सापडला.
संबंधित बातम्या