Thane News: ठाण्यात हनिमूनच्या ठिकाणावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीने जावायावर अॅसिड हल्ला केला. या घटनेत जावयाच्या चेहरा गंभीररित्या भाजला असून त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जावायाने आपल्या मुलीला हनिमूनसाठी परदेशात घेऊन जावे, अशी आरोपीची इच्छा होती. परंतु, जावायाने काश्मीर निवडले. यामुळे संतापलेल्या आरोपीने जावयावर अॅसिड फेकले. या घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
जावई इबाद अतीक फाळके (वय, २९), असे अॅसिड हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर, जाकी गुलाम मुर्तजा खोतल (वय, ६५) असे आरोपी सासऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फाळके यांनी नुकतेच खोतल याच्या मुलीशी लग्न केले होते. त्यानंतर फाळके यांनी आपल्या पत्नीला हनिमूनसाठी नेण्याचे ठरवले. परंतु, फाळके यांनी आपल्या मुलीला परदेशातील धार्मिक स्थळावर घेऊन जावे, अशी खोतल याची इच्छा होती. यामुळे दोघांमध्ये वाद झाला. या वादातून खोतल यांनी फाळके यांच्यावर अॅसिड हल्ला करण्याचे ठरवले.
दरम्यान, फाळके बुधवारी रात्री घरी परतले आणि त्यांनी आपली कार रस्त्याच्या बाजूला पार्क केली. आधीच दबा धरून बसलेल्या खोतल यांच्यावर अॅसिड फेकले. या हल्ल्यात फाळके यांच्या चेहऱ्याला आणि शरिराला गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार असल्याचे सांगण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खोतल याला फाळके जावई म्हणून आवडला नसून त्याला आपल्या मुलीचे फाळके यांच्याशी होणारे लग्न मोडायचे होते. या घटनेनंतर खोतल फरार झाला असून पोलीस त्याला पकडण्याचा प्रयत्न करत आहे. खोतल याच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम १२४ (१) (अॅसिड चा वापर करून गंभीर दुखापत करणे), ३५१ (३) (धमकावणे) आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या