Thane Kapurbawdi murder : ठाण्यातील कापूरबावडी परिसरात थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. येथील कोलशेत रोडवर असलेल्या एका उच्चभ्रू सोसायटीत सुरक्षा पर्यवेक्षकाची (Security Supervisor) मुंडकं छाटून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
ही घटना आजच घडली असल्याची प्राथमिक माहिती आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, येथील एका कमर्शियल कॉम्प्लेक्सच्या इमारतीच्या टेरेसवर डोकं कापलेल्या अवस्थेत सेक्युरिटी सुपरवायजरचा मृतदेह आढळून आला. कापूरबावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आणि ठाणे गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी पोहोचले असून, तपास सुरू आहे.
पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे. आर्थिक वादातून हा खून झाला असावा असा पोलिसांचा कयास आहे. आरोपी सुरक्षा रक्षकांपैकीच एखादा असावा, असाही अंदाज बांधला जात आहे.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, सोसायटीच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर मेसेज फिरू लागल्यानंतर आम्हाला या संदर्भात माहिती मिळाली. या घटनेमुळं सोसायटीतील रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमध्ये आणखी एका खुनाची घटना घडली आहे. या प्रकरणात एका २३ वर्षीय मजुरानं त्याच्या मालकाचा खून केला आहे. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पीटीआयनं दिलेल्या वृत्तानुसार, सलीम याकुब शेख असं आरोपीचं नाव आहे. त्यानं रविवारी कामगार कंत्राटदार अब्दुल रहमान (५२) यांचा खून केला. रोजची मजुरी १ हजार रुपयांवरून ७०० रुपयांपर्यंत कमी केल्याच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला होता. त्याच रागातून हा खून झाला, असं अंबरनाथ पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यानं सांगितलं.