Thane Bhiwandi Fire News: ठाण्याच्या भिवंडी येथील सॅनिटरी नॅपकिनच्या कारखान्याला मंगळवारी पहाटे आग लागल्याची घटना घडली. आगीची मिळताच अग्निशमन दलाचे जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या आगीत कोणतीही जिवीतहानी झाली नाही, अशी माहिती एका नागरी अधिकाऱ्याने दिली.
भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी राजू वरळीकर यांनी सांगितले की, सरवली औद्योगिक परिसरात असलेल्या कारखान्यात पहाटे तीनच्या सुमारास आग लागली.बीएनएमसीचे अग्निशमन दल तसेच ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि सकाळी ८.३० वाजेपर्यंत आग आटोक्यात आणण्यात आली. कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. परंतु, कारखान्यात साठवलेला कच्चा माल जळून खाक झाला, असे सांगून कुलिंग ऑपरेशन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. नेमकी आग कशामुळे लागली, याचे कारण तपासले जात आहे.
चेंबूरच्या सीजी रोडवरील स्मोक एन मिरर्स हेअर सलूनच्या मागे सिलिंडरचा स्फोट होऊन एकाच कुटुंबातील आठ जणांसह नऊ जण जखमी झाल्याची घटना गुरुवारी पहाटे घडली. शुक्रवारी सकाळी ७ वाजून ३७ मिनिटांनी झालेल्या या स्फोटात सलून आणि आजूबाजूच्या व्यावसायिक मालमत्ता, दुकाने आणि वाहनांचेही मोठे नुकसान झाले. गॅस गळतीमुळे ही आग लागल्याची शक्यता अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. या स्फोटात ज्योत्स्ना लिंबाजिया (वय,५३),पियुध्द लिंबाजिया (वय, २५), नितीन लिंबाजिया (वय, ५५) आणि प्रीती लिंबाजिया (वय, ३४) हे गंभीर भाजले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर, कुटुंबातील अन्य चार सदस्य ओम (वय,९), महक (वय, ११), पूनम (वय, ३५) आणि अजय (वय, ३३) हे किरकोळ भाजले.
अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बाधित कुटुंबाच्या घरात गॅस गळतीमुळे ही आग लागली. कुटुंबीयांनी आधी गॅस स्टोव्ह लाईटरने पेटवण्याचा प्रयत्न केला. पण गॅस न पेटल्याने त्यांनी माचिसबॉक्सचा वापर केला आणि मोठा स्फोट झाला. स्फोटाच्या किमान दोन ते तीन तास अगोदर सुरू झालेल्या गॅस गळतीची माहिती कुटुंबीयांना नव्हती. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, स्फोटामुळे मैदानातील विजेच्या वायरिंग आणि लाकडी फर्निचरसह घरातील संपूर्ण वस्तू उद्ध्वस्त झाल्या. स्फोट इतका भीषण होता की, तिथून जाणारे सुदाम शिरसाट (वय, ५५) हे रस्त्याच्या कडेला फेकले गेल्याने त्यांच्या डोक्याला आणि पायाला जखम झाली.
संबंधित बातम्या