मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Thane Crime : भिवंडीत दीड वर्षीय मुलाचे अपहरण करून विक्री अन्..

Thane Crime : भिवंडीत दीड वर्षीय मुलाचे अपहरण करून विक्री अन्..

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 27, 2023 10:20 PM IST

भिवंडीत एका दीड वर्षाच्या बालकांचे अपहरण करून एक लाख पाच हजारात विक्री केल्याचे प्रकरण समोर आले आहे. पोलिसांनी तात्काळ तपासांची चक्रे हलवून मुलाची सुखरुप सुटका केली व तीन जणांना अटक केली.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. भिवंडीत एका दीड वर्षीय चिमुकल्याचे घरातून अपहरण केले व एक लाख रुपयात विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणात भिवंडी शहर पोलिसांनी मुलाची सुखरूप सुटका करून तिघांना अटक केली आहे. गणेश मेमुल्ला (३८), भारती शाहू (४१) आणि आशा शाहू (४२) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे.

भिवंडी येथील कामतघर परिसरात २६ जानेवारीला २८ वर्षीय महिला कामानिमित्ताने बाहेर गेली होती. घरात दीड वर्षाचा मुलगा एकटाच होता. त्यांना घरी आल्यावर मुलगा कुठेही न आढळल्याने त्यांनी पोलिसांत धाव घेतली. त्यानंतर याप्रकरणी त्यांनी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

भिंवडी पोलिसांनी मुलाच्या अपहरणाचा गुन्हा नोंद करून तपास सुरू केला. त्यावेळी भिवंडीमध्ये राहणाऱ्या गणेश याचा याप्रकरणात सहभाग असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने गणेश याला कामतघर येथून ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबूली दिली. तसेच बालकाला भारती आणि आशा या दोन बहिणींना एक लाख पाच हजार रुपयांना विकल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी भारती आणि आशा या दोघींना ताब्यात घेतले. याप्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

WhatsApp channel