School Girl Raped and Murder : ठाणे जिल्ह्यात १३ वर्षीय शाळकरी मुलीवर बलात्कार करून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलीचा मृतदेह भिवंडी-कल्याण सीमेवरील गांधारी पुला नजीकच्या बापगाव या गावातील कब्रस्तान परिसरात मुलीचा मृतदेह आढळला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पडघा पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कल्याण शहरातील कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही शाळकरी मुलगी सोमवारी संध्याकाळपासून घरातून बेपत्ता झाली होती. पालकांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तिच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंद करत मुलीचा शोध घेतला असता तिचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
कल्याण पोलिसांना मंगळवारी सकाळी बापगाव येथील कब्रस्तान नजीकच्या निर्जनस्थळी या मुलीचा मृतदेह आढळून आला. मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली असून, हत्या करण्यापूर्वी तिच्यावर लैंगिक अत्याचार देखील केल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेने परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून एकच खळबळ उडाली आहे.
मृत मुलीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी आईकडून पैसे घेऊन खाऊ आणण्यासाठी जवळच्या दुकानात गेली होती. मात्र,त्यानंतर ती घरी परतलीच नाही. सोमवारी सायंकाळी चार वाजल्यापासून ती बेपत्ता होती. बराच वेळ झाला तरी ती घरी न आल्याने कुटूंबीयांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. रात्रीपर्यंत तिचा काहीच पत्ता न लागल्याने पालकांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आज सकाळच्या सुमारास पडघा पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या कल्याण भिवंडी सीमेवरील बापगावचे हद्दीत या मुलीचा मृतदेह आढळला.
एकाच परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीवर मृत मुलीच्या वडिलांनी संशय व्यक्त केला आहे. या व्यक्तीने वर्षभराआधी मुलीचा विनयभंग केला होता. त्यावेळी पॉक्सो गुन्ह्यांतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या झाल्याने पुन्हा त्या व्यक्तीवर संशय व्यक्त केला आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
संबंधित बातम्या