Thane: भरधाव कारची ऑटो रिक्षा आणि दुचाकीला धडक, ४ जण जखमी; ठाण्यातील उल्हासनगरातील घटना
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Thane: भरधाव कारची ऑटो रिक्षा आणि दुचाकीला धडक, ४ जण जखमी; ठाण्यातील उल्हासनगरातील घटना

Thane: भरधाव कारची ऑटो रिक्षा आणि दुचाकीला धडक, ४ जण जखमी; ठाण्यातील उल्हासनगरातील घटना

Dec 25, 2024 09:41 AM IST

Car Hits Auto Rickshaw Driver and Biker In Thane: ठाण्यातील उल्हासनगर येथे एका भरधाव कारने ऑटो रिक्षा आणि दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात ४ जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

भरधाव कारची ऑटो रिक्षा आणि दुचाकीला धडक
भरधाव कारची ऑटो रिक्षा आणि दुचाकीला धडक

Thane Ulhasnagar Accident News: ठाण्यातील उल्हासनगरमध्ये एका भरधाव कारने ऑटो रिक्षा आणि दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत चार जण जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी पहाटे ५ वाजता उल्हासनगरमधील व्हीनस चौकात घडली. हा अपघात नेमका कशामुळे झाला? हे अद्याप समजू शकलेले नसून याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धुळ्याहून उल्हासनगरकडे जाणाऱ्या कारने ऑटो रिक्षाचालक आणि दुचाकीला धडक दिली. या धडकेत चार जण जखमी झाले. तन्वर भावसार (कार चालक) दशरथ मोरे (रिक्षाचालक), दीपक पाटकर (दुचाकीस्वार) आणि मोहित जैन अशी जखमींची नावे आहेत. मोहित जैन हा चालकाच्या बाजूला बसला होता. तन्वर भावसार आणि मोहित जैन या दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. तर, रिक्षाचालक आणि दुचाकीस्वार हे किरकोळ जखमी झाले आहेत.

तन्वर आणि मोहित कारने उल्हासनगरच्या दिशेने जात असताना व्हीनस चौकात त्यांनी एका ऑटो रिक्षाला धडक दिली. नंतर रस्त्याच्या कडेला असलेल्या विजेच्या खांबाला धडकण्यापूर्वी दुचाकीस्वाराला धडक दिली. या अपघातात कारचा अशरक्ष: चक्काचूर झाला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थानिक पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर स्थानिकांनी कारमध्ये अडकलेल्या दोन जणांना बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात नेले.

विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक रोहिणी पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी कार चालक दारुच्या नशेत होता की नाही, हे तपासण्यासाठी त्याच्या रक्ताचे नमुने तपासण्यासाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत.या घटनेतील दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर, इतर दोघांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.आम्ही घटनास्थळाचा पंचनामा केला आणि अपघाताबाबत प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवले. पुढील तपास सुरू आहे.' याप्रकरणी भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

देशात गेल्यावर्षी १ लाख ७० हजारांहून अधिक लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. तर, ४ लाख ६३ हजार लोक जखमी झाले आहेत. २०२२ च्या तुलनेत ही संख्या ४ टक्क्यांनी वाढली आहे. देशात दर तीन मिनिटाला एकाचा रस्ते अपघातात मृत्यू होत आहे. रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अहवालानुसार, महाराष्ट्रासह एकूण २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये वाढ रस्ते अपघातातील मृत्यूंमध्ये वाढ झाली आहे, यात उत्तर प्रदेश , मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, पंजाब, आसाम आणि तेलंगणा यांसारख्या राज्याचा समावेश आहे.

देशात सर्वाधिक अपघाती मृत्युंची नोंद तामिळनाडूत (१८ हजार ३४७) करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. महाराष्ट्रात २०२३ मध्ये १५ हजार ३६६ जणांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे. तर, मध्य प्रदेश आणि कर्नाटकमध्ये अनुक्रमे १३ हजार ७९८ आणि १२ हजार ३२१ हजार मृत्युची नोंद झाली. तामिळनाडूत जखमींची (७२ हजार २९२) संख्या मोठी आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर