Samruddhi Expressway Accident: ठाणे जिल्ह्यातील समृद्धी एक्स्प्रेस वेच्या बांधकाम साईटवर भरधाव डंपरने तीन मजुरांना उडवले. या अपघातात एका मजुराचा मृत्यू झाला आहे. तर, दोन जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ठाणे जिल्ह्यातील कसारा भागातील वाशाळा पुलाजवळ रविवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मिळालेल्या महितीनुसार, अशोक जाधव (वय, ५०) असे अपघातात मरण पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेत अशोक यांचा २२ वर्षांचा मुलगा आणि ६० वर्षांची महिला जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. कसारा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, ठाणे जिल्ह्यातील समृद्धी एक्स्प्रेस वेच्या बांधकाम साईटवर काम करीत होते. रविवारी काम आटोपल्यानंतर तिघेही रस्त्याच्या कडेला झोपले असताना तेथून जाणाऱ्या डंपरने त्यांना उडवले.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवला आणि जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल केले, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले. भारतीय दंड संहिता आणि मोटार वाहन कायद्याच्या संबंधित तरतुदींनुसार डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
धुळ्यात एलएम सरदार हायस्कूल परिसरात (२६ मे २०२४) रविवारी दुपारी भरधाव ट्रकच्या धडकेत १८ वर्षीय दुचाकीस्वारचा मृत्यू झाला. याप्रकरणातील ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील कारवाईला सुरुवात केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राहुल योगेश सूर्यवंशी असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. राहुल हा रविवारी दुपारी आपल्या दुचाकीने दत्त मंदिर चौकातून घरी जात असताना भरधाव ट्रकने त्याच्या दुचाकीला धडक दिली. यानंतर राहुल खाली पडल्याने ट्रकच्या मागील चाकाखाली चिरडला गेला. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
संबंधित बातम्या