मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Thane Shiv Sena: ठाण्यात शिवसेनेला खिंडार; ६६ नगरसेवकांचा शिंदे गटाला पाठिंबा

Thane Shiv Sena: ठाण्यात शिवसेनेला खिंडार; ६६ नगरसेवकांचा शिंदे गटाला पाठिंबा

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jul 07, 2022 05:45 PM IST

Majority Thane Corporators with Eknath Shinde: ठाणे महापालिकेतील शिवसेनेच्या तब्बल ६६ नगरसेवकांनी एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे.

Thane Municipal Corporation
Thane Municipal Corporation

Thane Shiv Sena Split: एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत पडलेल्या फुटीची तीव्रता वाढतच असून आता हे लोण ठाणे जिल्ह्यातील पसरलं आहे. ठाणे महापालिकेतील शिवसेनेच्या ६६ नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळं शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

ठाणे महापालिकेत शिवसेनेचे ६७ नगरसेवक आहेत. मुदत संपल्यामुळं सध्या ठाणे महापालिकेवर प्रशासक असून तांत्रिकदृष्ट्या हे नगरसेवक माजी आहेत. मात्र, यातील ६६ नगरसेवकांनी आपण एकनाथ शिंदे यांच्याशी एकनिष्ठ असल्याचं स्पष्ट केलं आहे. बुधवारी रात्री या नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.

एकनाथ शिंदे यांचे ठाणे जिल्ह्यात वर्चस्व आहे. आनंद दिघे यांच्या निधनानंतर सुरुवातीचे काही दिवस वगळता ठाणे जिल्हा शिवसेनेची संपूर्ण जबाबदारी शिंदे यांच्यावरच होती. या काळात त्यांनी संघटना बांधत असताना माणसेही जोडली होती. ठाणे, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, मीरा-भाईंदर अशा अनेक महापालिकांच्या निवडणुकीत शिंदे यांच्या शिफारसीनंच तिकीट वाटप होत असे. त्यामुळं साहजिकच येथील बरेचसे नगरसेवक शिंदे यांच्यासोबत राहतील, हे दिसत होते. मात्र, इतक्या मोठ्या संख्येनं नगरसेवक त्यांना पाठिंबा देतील अशी अपेक्षा नव्हती. ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी याआधीच शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. शिंदे यांच्या बंडानंतर ठाण्यात निघालेल्या मोर्चात म्हस्के हे आघाडीवर होते.

शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी ठाण्यातील अनेक नगरसेवकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना अजिबात प्रतिसाद मिळाला नाही. तेव्हाच शिवसेना नेतृत्वाला मोठ्या संकटाची चाहूल लागली होती. आता तब्बल ६६ नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिल्यामुळं शिवसेनेपुढं मोठं आव्हान उभं राहिलं आहे. अनेक महत्त्वाचे पदाधिकारी देखील एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्यानं आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेला ठाणे शहरात उमेदवार शोधावे लागणार आहेत. जिल्हा प्रमुखापासून ते शाखाप्रमुखांपर्यंत अनेक नियुक्या नव्यानं कराव्या लागणार आहेत.

ठाण्याबरोबरच कल्याण, डोंबिवली, पालघर, मीरा-भाईंदर, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर या शहरांमध्येही शिवसेनेला अशाच बंडाळीला तोंड द्यावं लागेल, असं एका पदाधिकाऱ्यानं नाव न देण्याच्या अटीवर सांगितलं.

WhatsApp channel

संबंधित बातम्या