Thane News: ठाण्यातील चार मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या १५ वर्षाच्या मुलावर छत कोसळल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना भोईवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भिवंडीतील कारिवली परिसरात शुक्रवारी (१६ ऑगस्ट २०२४) रात्री घडली. किशन पटेल असे मृत मुलाचे नाव आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी किशन घरात झोपला होता आणि त्याची आई संध्या पटेल किचनमध्ये जेवण बनवत होत्या. त्यानंतर संध्या यांना मोठा आवाज आला. नेमके कशाचा आवाजा आला, हे पाहण्यासाठी गेलेल्या संध्या यांना किशन हा छत कोसळून जखमी झाल्याचे दिसले. त्यांनी ताबडतोब शेजाऱ्यांना याबाबत माहिती दिली. यानंतर किशनला बेशुद्धावस्थेत ठाणे येथील इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात अपघाती मृत्युची नोंद करण्यात आली.
ठाणे जिल्ह्यातील कसारा घाटात दुधाचा टँकर २०० फूट खोल दरीत कोसळल्याची रविवारी घटना घडली. या घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर, चार जण जखमी झाले आहेत. मुंबईच्या दिशेने निघालेल्या टँकरचालकाचे वळण घेताना चाकावरील नियंत्रण सुटल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असून अधिक माहितीची प्रतीक्षा आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
रविवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. अपघातग्रस्त टँकर नाशिक जिल्ह्यातील सिन्नरयेथून मुंबईच्या दिशेने जात होता, अशी माहिती ठाणे ग्रामीण पोलिसांनी दिली. बचाव आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत मुसळधार पावसात दोरीच्या सहाय्याने जखमी व्यक्ती आणि मृतदेह बाहेर काढले. मृतदेह शवविच्छेदन आणि ओळख पटविण्यासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. जखमींना खासगी रुग्णवाहिकेतून घोटी गावातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील तपास सुरू आहे.
विजय घुगे (वय ६०,), आरती जायभावे (वय, ३१), सार्थक वाघ (वय, २०), चालक योगेश आढाव (वय, ५०) आणि रामदास दराडे (वय, ५०) अशी अपघाता पावलेल्यांची नावे आहेत. तर, अक्षय घुगे (वय, ३०), श्लोक जायभावे (वय, ५), अनिकेत वाघ (वय, २१) असे जखमींचे नावे आहेत. जखमींवर कसारा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.