मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Thackeray Vs Shinde : “हा तर केवळ ट्रेलर, पिक्चर अजून बाकी”, शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा

Thackeray Vs Shinde : “हा तर केवळ ट्रेलर, पिक्चर अजून बाकी”, शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Sep 20, 2022 07:12 PM IST

महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडावं म्हणून मी पाच वेळा सांगितलं, मात्र झोपलेल्यांना जागं करणं सोपं असतं मात्र झोपेचे सोंग घेतलेल्यांना कसे जागं करणार, असा सवाल करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

जळगाव – आम्ही शिवसेना-भाजप युती म्हणून मागची निवडणूक लढवली होती. आम्ही बाळासाहेब ठाकरे आणि नरेंद्र मोदींचा फोटो लावून निवडणूक जिंकलो होतो. शरद पवार आणि सोनिया गांधींचे फोटो लावून निवडून आलो नव्हतो. आम्ही जर हे पाऊल उचललं नसतं तर काय परिस्थिती झाली असती, हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडावं म्हणून मी पाच वेळा सांगितलं, मात्र झोपलेल्यांना जागं करणं सोपं असतं मात्र झोपेचे सोंग घेतलेल्यांना कसे जागं करणार, असा सवाल करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. 

शिवसेना पक्षात अंतर्गत बंड करण्यापूर्वी आपण पाच वेळा पक्षप्रमुखांशी चर्चा केल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. महाविकास आघाडीने गेल्या अडीच वर्षात जेवढं काम केलं नाही, तेवढं काम आम्ही अवघ्या अडीच महिन्यात केल्याने नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत आम्हाला मोठं यश मिळालं, असंही एकनाथ शिंदे म्हणाले. मुख्यमंत्री आज जळगाव येथील पाळधी शासकीय विश्रामगृहाच्या लोकार्पण सोहळ्यात बोलत होते.

शिवसेनेनं २०१९ मध्ये असंगाशी संग केला होता. अजूनही आम्ही महाविकास आघाडीमध्ये राहिलो असतो, तर बोटावर मोजायलाही शिवसेना शिल्लक राहिली नसती. याबाबत मला गुलाबराव पाटील म्हणाले होते, आपण सर्वजण एकत्र येऊन २०१९ ची चूक दुरुस्त करू… मी त्यांना म्हणालो,  माझं पाच वेळा बोलून झालं आहे. आपण झोपलेल्या माणसाला जागं करू शकतो. झोपेचं सोंग घेणाऱ्यांना माणसाला कसं जागं करायचं? असा टोला एकनाथ शिंदे यांनी सांगितला आहे.

ही तर केवळ झांकी आहे..

यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपा आघाडीवर आहे. महाविकास आघाडी सरकारने गेल्या अडीच वर्षात सगळ्यांना फक्त घरात बसवण्याचं काम केलं. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून लोकांनी त्यांना त्यांच्या कामाची पोहोच पावती दिली आहे. महाराष्ट्रातील जनतेमुळं आम्हाला यश मिळालं आहे. पण ही तर केवळ झांकी आहे, पिक्चर अजून बाकी आहे.

 

IPL_Entry_Point