मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Andheri Bypoll Election : अंधेरी पोटनिवडणुकीत विजयानंतर ऋतुजा लटकेंची प्रतिक्रिया, म्हणाल्या...

Andheri Bypoll Election : अंधेरी पोटनिवडणुकीत विजयानंतर ऋतुजा लटकेंची प्रतिक्रिया, म्हणाल्या...

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Nov 06, 2022 02:55 PM IST

Andheri East Bypoll Result 2022 : अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटकेंनी मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवला आहे.

Andheri East Bypoll Result 2022
Andheri East Bypoll Result 2022 (HT)

Andheri East Bypoll Result 2022 : अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटकेंचा मोठ्या मताधिक्यानं विजय झाला आहे. त्यामुळं गेल्या काही दिवसांपासून संकटात सापडलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा राजकीय दिलासा मिळाला आहे. अंधेरीत १९ व्या फेरीअखेरीस ६६३४७ मतं मिळाली असून १२७७६ मतं नोटाला मिळाली आहेत. त्यामुळं ऋतुजा लटकेंचा विजय झालेला असला तरी मोठ्या संख्येनं मतदारांनी नोटाचा पर्याय स्वीकारल्याचं निकालातून स्पष्ट झालं आहे. परंतु आता पोटनिवडणुकीत विजय मिळवल्यानंतर ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटकेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

पोटनिवडणुकीत विजय मिळवल्यानंतर माध्यमांशी बोलताना ऋतुजा लटके म्हणाल्या की, या पोटनिवडणुकीत मिळालेला विजय हा माझा नसून माझे पती रमेश लटके यांचा आहे. त्यांनी त्यांच्या संपू्र्ण राजकीय कारकिर्दीत लोकांची सेवा आणि मतदारसंघात विकासकामं केली. त्यामुळं त्याची पोचपावती देत मतदारांनी परतफेड केल्याचं विजयी उमेदवार ऋतुजा लटके म्हणाल्या.

पोटनिवडणुकीत भाजपनं माघार घेतली होती, मात्र त्यांनी लोकांना नोटाचा पर्याय स्वीकारण्याचं आवाहन केलं होतं. त्याचे अनेक व्हिडिओही समोर आलेले आहेत, असं म्हणत ऋतुजा लटकेंनी भाजपवर कुरघोडी केल्याचा आरोप केला आहे. रमेश लटकेंच्या राजकीय कारकिर्दीत जी विकासकामं अपूर्ण राहिली आहेत, त्यांना पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही लटके म्हणाल्या. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि अनिल परब यांचंही आभार मानलं आहे.

दरम्यान भाजपनं त्यांचा उमेदवार मागे घेतल्यानंतर मी त्यांचे आभार मानले होते. परंतु त्यांनी ऋतुजा लटकेंप्रती सहानुभूती दाखवत अंधेरीत नोटाचा प्रचार केला. भाजपनं माघार घेऊन लटकेंना पाठिंबा देण्यात काहीही अडचण नव्हती. परंतु भाजपच्या कार्यकर्त्यांनी नोटाचा प्रचार केल्याचा आरोप अनिल परबांनी केला आहे.

WhatsApp channel