मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  TET SCAM : पुणे जिल्ह्यातील 'त्या' गुरुजींच्या कागदपत्रांची तपासणी सुरू; झेडपीत आज हजर झाले ६० शिक्षक

TET SCAM : पुणे जिल्ह्यातील 'त्या' गुरुजींच्या कागदपत्रांची तपासणी सुरू; झेडपीत आज हजर झाले ६० शिक्षक

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Dec 05, 2022 07:24 PM IST

Pune zilha parishad teacher documents checking : पुणे जिल्हा परिषदेने शिक्षण सेवकांच्या कागद पत्रांची तपासणी सुरू केली आहे. आज ६० शिक्षकांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली आहे. यात त्याच्या टीईटी प्रमाण पत्राचा देखील समावेश आहे.

टीईटी घोटाळा
टीईटी घोटाळा

पुणे : पुणे जिल्हा परिषदेने टीईटी घोटाळ्याशी संबंधित तसेच भरती करण्यात आलेल्या काही शिक्षण सेवकांचा तीन वर्षांचा कालावधी संपला असल्याने त्याच्या कागदपत्रांची पुनर्रतपासणी सुरू केली आहे. तब्बल १७० शिक्षकांची तपासणी होणार असून आज ६० शिक्षकांनी त्यांची कागदपत्रं जिल्ह्या परिषदेच्या शिक्षण विभागाला सादर केली आहे. या कागद पत्रांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. बुधवार पर्यंत १७० शिक्षण सेवक, उप शिक्षकांना तपासणीसाठी बोलवण्यात आले आहे.

कोट्यवधींच्या टीईटी घोटाळा उघडकीस आल्याने राज्यात खळबळ उडाली होती. या घोटाळ्यात अनेकांनी बोगस प्रमाणपत्रे सादर करून ही परीक्षा पास करत नोकरी मिळवली होती. राज्य परीक्षा विभागाने तब्बल ८ हजार विद्यार्थ्याची यादी प्रसिद्ध केली होती. यातील पुण्यात कार्यरत असणाऱ्या शिक्षण सेवक, उपशिक्षक असणाऱ्या तब्बल १७० शिक्षकांची यादी शिक्षण विभागाला मिळाली असून सोमवार पासून या शिक्षकांच्या या शिक्षण सेवकांच्या मूळ कागदपत्रे तपासनीस सुरुवात झाली आहे. आज ६० शिक्षण सेवकांनी जिल्हा परिषेदेच्या शिक्षण विभागात उपस्थित राहून मूळ कागदपत्रे दिली आहेत. यात नियुक्ती आदेश छायांकित प्रत आणि टीईटी उत्तीर्ण मुळ प्रमाण पत्राचा समावेश आहे.

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने आपल्या संकेतस्थळावर तब्बल ८ हजार परीक्षार्थींची यादी प्रसिद्ध करून त्यांची संपादणूक रद्द करण्यासाठी यापुढे त्यांना ही परीक्षा कधीच देता येणार नाही, अशी कारवाई केली होती. शिक्षक पात्रता परीक्षेतील घोटाळा पुणे शहर पोलिसांनी वर्ष २०२१ मध्ये उघडकीस आणला होता. आरोग्य विभागाच्या परीक्षेत झालेल्या घोटाळ्याची चौकशी करताना त्यांनी टीईटी परीक्षेतील घोटाळ्याची माहिती मिळाली. त्यानंतर वर्ष २०१९ च्या टीईटी घोटाळ्याची चौकशी करतानाच वर्ष २०१८ मधील टीईटीही गैरप्रकार झाल्याचे आढळून आले.

राज्य परीक्षा परिषदेने पुणे जिल्ह्यातील १७० जणांची यादी ही जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला दिली आहे. शिक्षण विभागातर्फे आज पासून या शिक्षकांच्या कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे. आज (दि ५) यादीतील क्रमांकानुसार १ ते ६० शिक्षकांच्या कागद पत्रांची तपासणी करण्यात आली. उद्या मंगळवारी (दि ६) रोजी ६१ ते १२१ क्रमांक असणाऱ्या शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची तपासणी केली जाणार आहे. तर बुधवारी १२१ ते १७० क्रमांक असणाऱ्या शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची तपासणी केली जाणार आहे. यात दोशी असणाऱ्यांवर शासकीय नियमानुसार कारवाई केली जाणार असल्याची माहिती आहे.

वर्ष २०१९ मध्ये झालेल्या टीईटीतील घोटाळ्यात अडकलेल्या साडेसात हजारांवर उमेदवारांचीदेखील परीक्षा परिषदेने संपादणूक रद्द करून त्यांना या परीक्षेसाठी कायमस्वरूपी प्रतिबंधित करण्यात आले होते. तसेच त्यातील वेतन सुरू असलेल्या शिक्षकांचे शालार्थ आयडी गोठवून वेतन बंद करण्याचे आदेश दिले होते. परंतु, या आदेशाला संबंधित परीक्षार्थींनी न्यायालयात आव्हान दिले. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग