Terrorists Entered Dongri Area In Mumbai: मुंबई पोलिसांना पुन्हा एकदा धमकीचा फोन आला . यावेळी फोन करणाऱ्या व्यक्तीने पोलीस नियंत्रण कक्षाला सांगितले की, मुंबईच्या डोंगरी भागात काही दहशतवादी घुसले आहेत. हा फोन आल्यानंतर मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला एकच खळबळ उडाली. यानंतर पोलिसांनी अधिक चौकसी केली असता फोनद्वारे देण्यात आलेली माहिती खोटी असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे.
एएनआय वृत्तसंस्थेने मुंबई पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी शुक्रवारी संध्याकाळी धमकीचा फोन आला, ज्यात मुंबईच्या डोंगरी भागात दहशतवादी घुसल्याची माहिती दिली आणि त्यांना पोलिसांच्या मदतीची गरज आहे. या फोननंतर मुंबई पोलीस नियंत्रण कक्षात खळबळ माजली. याप्रकरणी अधिक चौकशी केली असता हा फोन बनावट असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली असून पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली.
मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात यापूर्वीही अशा धमकीचे बनावट फोन आले आहेत. गेल्या आठवड्यातच पोलिस नियंत्रण कक्षाला एक फोन आला होता, ज्यामध्ये कुलाब्यातील ताजमहाल पॅलेस हॉटेलमध्ये १०- ११ सशस्त्र पाकिस्तानी घुसल्याचा दावा करण्यात आला होता. फोनचे गांभीर्य लक्षात घेऊन कुलाबा पोलिस अधिकाऱ्यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांसह हॉटेलची कसून झडती घेतली. मात्र, कोणताही पुरावा सापडला नाही. यानंतर फोन निव्वळ अफवा असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले.
मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर पोलीस प्रत्येक क्षणी अलर्ट मोडवर असतात. त्यावेळीही पाकिस्तानातून अनेक दहशतवादी समुद्रमार्गे मुंबईत घुसले होते आणि त्यांनी ताज हॉटेलसह अनेक ठिकाणी गोळीबार केला होता. या दहशतवादी हल्ल्यात १७० निष्पाप लोकांना जीव गमवावा लागला. तर, ३०० हून अधिक जण जखमी झाले.