Sanjay Raut on J&K Terrorist Attack : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी तिसऱ्यांना शपथ घेतली. मात्र, हा शपथ विधी सोहळा सुरू असतांना जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यानी वैष्णवदेवीच्या यात्रेसाठी जात असतांना भावीकांवर गोळीबार केला. यात १० भाविक ठार झाले तर काही जखमी झाले. या घटनेवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत यांनी ट्विटधे म्हटले आहे की, ३७० कलम हटवल्यानंतर काश्मीरमध्ये होणारे दहशतवादी हल्ले आता जम्मूमध्ये देखील होऊ लागले आहे. मोदी शपथ घेत असतांना दुसरीकडे मात्र, जम्मूमध्ये दहशतवादी रक्तरंजित खेळ सुरू होता, असे म्हणत राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली.
संजय राऊत यांनी ट्विट करत लिहिले आहे की, यापूर्वी काश्मीर खोऱ्यात दहशतवादी घटना घडायच्या. मात्र, मोदी सरकार ऐवढे बलवान ठरले आहे की, ३७० कलम हटवल्यानंतर आता जम्मूमध्ये देखील दहशतवादी हल्ले होऊ लागले आहेत. या ठिकाणी या पूर्वी कधीही हल्ले झाले नव्हते. आजही जम्मूतच एक हल्ला झाला. या हल्ल्यात १० भविकांचा मृत्यू झाला. हा हल्ला झाला तेव्हा मोदी शपथ घेत होते तर जम्मूत दहशतवाद्यांचा रक्तरंजित खेळ सुरू होता. आज देखील काश्मिरी पंडित त्यांच्या घरी परत जाऊ शकले नाहीत. मोदीजी, काश्मिरी पंडित घरी कधी परतणार? असा सवाल संजय राऊत यानी सरकारला केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार रविवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा सुरू होता. दरम्यान, वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या भरलेल्या बसवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या हल्ल्यात १० भाविकांचा मृत्यू झाला. अपघातात जखमी झालेल्या अनेक भाविकांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याचवेळी भारतीय लष्कर, सीआरपीएफ, जम्मू-काश्मीर पोलिसांनी दहशतवाद्यांच्या शोधात शोधमोहीम सुरू केली आहे. हा हल्ला जम्मू-काश्मीरमधील रियासी भागात झाला. शिवखोडी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर भाविक माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी बसने कटरा येथे जात होते. मात्र, बस जंगल परिसरात पोहोचताच लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी बसवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. दहशतवाद्यांच्या गोळीबारामुळे घाबरलेल्या बस चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस खड्ड्यात पडली. या बसबसमध्ये जवळपास ५० भाविक होते.
कॉँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देखील ट्विटरवर पोस्ट करून दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मारल्या गेलेल्यांप्रती शोक व्यक्त केला आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, जम्मू-काश्मीरमध्ये भाविकांनी भरलेल्या बसवर भ्याड दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात १० भाविक ठार तर अनेक जण जखमी झाले आहेत. हे दुःखद व लज्जास्पद आहे. काँग्रेस परिवार शोकाकुल कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करत असून मृतांच्या आत्म्यास ईश्वर शांती देवो व जखमी लवकरात लवकर बरे होवोत, अशी प्रार्थना.