जालना: जालना शहरात एका आयशर टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीवरील तीन लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. हा भीषण अपघात रविवारी (दि २५) रात्री मंठा-अंबड बायपास मार्गावरील रेल्वे उड्डाणपुलावर घडला.
नुरेन फातेमा सादेक शेख (वय ७), आयेजा फातेमा सादेक शेख (वय ५) अदाबिया फातेमा सय्यद शोएब (वय ९, सर्व रा. तद्वपुरा, जालना) अशी या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या मृत लहान मुलांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारची सुट्टी असल्याने सय्यद शोएब हे त्यांच्या मुलांसह साडूच्या लेकरांना घेऊन सायंकाळी पाचच्या सुमारास मोतीबागेत खेळण्यासाठी घेऊन गेले होते. यावेळी बगिचातून पुन्हा घरी जात असतांना सायंकाळी ७.३० च्या सुमारास दुचाकीवरुन घराकडे परतत असतांना बायपास मार्गावरील उड्डाणपुलावर त्यांच्या पाठीमागून एक आयशर टेम्पो भरधाव वेगात आला.
या टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात अदाबिया फातेमा सय्यद शोएब, नुरेन फातेमा सादेक शेख, आयेजा फातेमा सादेक शेख यांचा जागीच मृत्यू झाला. तर सय्यद शोएब आणि अन्य एक मुलगा गंभीर जखमी झाला. अपघातानंतर मोठ्या प्रमाणात नागरिक घटनास्थळी जमा झाले. त्यांनी तातडीने सर्वांना दवाखान्यात भरती केले. मात्र, तीन मुलांचा मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच कदीम ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने, उपनिरीक्षक नागरे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. या अपघाताची माहिती कुटुंबीयांना मिळताच नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली. रुग्णालयात डॉक्टरांनी तीनही चिमुकल्यांना मृत घोषित करताच नातेवाईकांनी रुग्णालयात आक्रोश केला.
संबंधित बातम्या