Dharavi News : मुंबईतील धारावी परिसरात एका मशिदीचे बेकायदा बांधकाम तोडण्यावरून प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. संतप्त जमावानं कारवाईला विरोध करत मुंबई महापालिकेच्या वाहनाची तोडफोड केली आहे. घटनास्थळी पोलीस कुमक वाढवण्यात आली असून वातावरण शांत करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.
धारावीतील मेहबूब-ए-सुबानी मशिदीचं काही बांधकाम बेकायदा असल्याचं निदर्शनास आल्यानंतर महापालिकेचं पथक आज सकाळी कारवाईसाठी तिथं पोहोचलं होतं. मात्र, या पाडकामाला स्थानिकांनी तीव्र विरोध केला. मोठ्या संख्येनं जमलेल्या जमावानं महापालिकेच्या वाहनांवर दगडफेक करून त्याच्या काचाही फोडल्या. त्यामुळं तणाव निर्माण झाला.
तणाव निर्माण झाल्याचं कळत तिथं पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. वरिष्ठ पोलीस घटनास्थळी पोहोचले. कारवाईला विरोध करत जमावानं रस्त्यावरच ठाण मांडलं आहे. ही मशीद अनेक वर्षे जुनी आहे. त्यामुळं त्यावर कारवाई केली जाऊ नये, असं मुस्लिम समाजाचं म्हणणं आहे. ताज्या माहितीनुसार, पोलीस सध्या जमावाची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत.
आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असलेल्या धारावीत सध्या पुनर्विकासाचे वारे वाहत आहेत. या पुनर्विकासाला स्थानिकांचा अनेक कारणांवरून विरोध होत आहे. त्यामुळं धारावीत अस्वस्थता असतानाच आता पाडकामाच्या कारवाईवरून तणाव निर्माण झाला आहे.
उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी या प्रश्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना परिस्थितीची माहिती दिली. लोकांच्या भावना त्यांनी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवल्या तसंच एक निवेदनही दिलं. धारावी पुनर्वसन प्राधिकरणाच्या माध्यमातून या मशिदीची चौकशी करावी. अतिक्रमणाबाबतच्या चौकशीचा अहवाल आल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जावा, असं गायकवाड यांनी मुख्यंमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. महापालिका अधिकाऱ्यांनी या संदर्भात चर्चा करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.