shinde group return to the uddhav thackeray group : महाविकास आघाडीचे सरकार असतांना एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांसोबत बंडखोरी करून शिवसेनेत फुट पाडली होती. यानंतर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. दरम्यान, शिंदे गटातील काही आमदार नाराज असून ते पुन्हा काही दिवसांत ठाकरे गटात पुन्हा प्रवेश करतील असा दावा अॅड. असीम सरोदे यांनी केला आहे. सरोदे यांनी नाराज आमदारांची नावे देखील सांगितली असून त्यांच्या या द्याव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
राज्यात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहे. यात अनेक राजकीय नेते एकमेकांवर कुरघोडीचे राजकारण करत आहेत. शिवसेनेत फुट पडल्यावर मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांना मिळाले. तर त्यांच्या गटातील काही आमदारांना मंत्रिपद देखील मिळाले. मात्र, इतर आमदारांना काही मिळाले नाही. यामुळे ते नाराज असल्याची चर्चा आहे. पक्षचिन्ह आणि पक्षनाव जरी शिंदे गटाला मिळाले असले तरी सहानुभूति ही उद्धव ठाकरे गटाला आहे.
अॅड. असीम सरोदे यांनी शिंदे गटातील काही आमदारांची घुसमट होत असल्याचा दावा केला आहे. यामुळे यातील काही आमदार हे पुन्हा उद्धव ठाकरे गटात परत येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. चंद्रपूर येथे निर्भय बनोच्या एका सभेत बोलत असतांना सरोदे यांनी हा दावा केला आहे. सरोदे या सभेत म्हणाले, की एकनाथ शिंदे यांना ठाण्यापलीकडे कुणी ओळखत नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या सोबत कोणतेही भविष्य नाही. हे या आमदारांना आता कळून चुकल्याने तसेच त्यांची घुसमट होत असल्याने या आमदारांनी पुन्हा उद्धव ठाकरे गटात येण्याची मनीषा व्यक्त केली आहे.
सरोदे यांनी यावेळी शिंदे गटातून पुन्हा परत येण्यास इच्छुक असणाऱ्यांची नावे देखील जाहीर केली. तब्बल १० ते १२ जणांची नवे त्यांनी जाहीर केली. आमदार लता सोनावणे, आमदार श्रीनिवास वनगा, महेंद्र दळवी, प्रकाश सुर्वे, चिमणराव पाटील, बालाजी कल्याणकर, उदयसिंह राजपूत, प्रदीप जयस्वाल, महेश शिंदे व प्रकाश आबिटकर हे आमदार परत येण्यास उत्सुक असल्याचे सरोदे यांनी जाहीर भाषणात म्हटले आहे.
संबंधित बातम्या