Tempo Container Collision On Samruddhi Highway: समृद्धी महामार्गावर आज पहाटे भीषण अपघात घडला. टेम्पोने बाजूने जाणाऱ्या कंटेनरला धडकल्याने तिघांचा मृत्यू झाला आहे. तर, काही जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चालकाला झोप लागल्याने हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे. अमरावती येथील तळेगाव दशासर पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगरहून रायपूरकडे जाणाऱ्या खासगी टेम्पोने बाजूने जाणाऱ्या कंटेनरला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, टेम्पोच्या समोरील भागाचा पूर्णपणे चुराडा झाला. अमरावती येथील वाढोना शिवणीदरम्यान पहाटे पाच वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. या घटनेची माहिती मिळताच तळेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या अपघातानंतर चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
समृद्धी महामार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या महामार्गावर आतापर्यंत घडलेल्या अपघातात ३६८ लोकांचा मृत्यू झाला. यातील १८३ अपघात चालकाला झोप लागल्याने घडले आहेत. तर, ५१ अपघात टायर फुटल्याने घडल्याची नोंद आहे. याशिवाय, तांत्रिक कारणांमुळे २०० हून अधिक अपघात झाले आहेत. ज्यात ४१ जणांचा मृत्यू झाला आहे.
समृद्धी महामार्गावर ४० टक्के अपघात ‘साईड डॅश’मुळे होत आहेत. तसेच ३३ टक्के अपघात महामार्ग संमोहनामुळे होत असल्याचे समोर आले आहे. याशिवाय, वाहनांचा अतिवेग, तांत्रिक बिघाड यामुळे ४६ टक्के अपघात झाले. याचबरोबर १५ टक्के अपघात टायर पंक्चर किंवा फुटल्यामुळे झाला आहे.