Weather Update Maharashtra : गेल्या महिन्याभरापासून राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसानं धुमाकूळ घातल्यामुळं संकटात सापडेल्या बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे. कारण आता गेल्या आठवड्यापासून राज्यातील वातावरणात मोठा बदल झाला असून तापमानात मोठी वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांचं तापमान हे ४० अंशापुढे गेल्यामुळं नागरिकांची मोठी तारांबळ उडाली आहे. याशिवाय मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्याचं तापमान हळूहळू वाढत आहे. महाराष्ट्रात उन्हाचा चटका वाढत असून कमाल तापमानात आणखी वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
विदर्भात उच्चांकी तापमानाची नोंद...
गेल्या २४ तासांमध्ये विदर्भातील वर्धा जिल्ह्यात तब्बल ४०.०२ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे. यंदाच्या उन्हाळ्यात विदर्भात पहिल्यांदाच उन्हाचा पारा चाळीशीपार गेला आहे. याशिवाय विदर्भातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये ३८ अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान आहे. त्यामुळं आता पुढील काही दिवसांत विदर्भातील तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याशिवाय पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णता वाढत असल्याचं दिसून येत आहे.
उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता...
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कमाल आणि किमान तापमानात वाढ होत असतानाच उत्तर महाराष्ट्रात मात्र अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नाशिक, जळगाव, नंदूरबार आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये येत्या ४८ तासांमध्ये तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं आता शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहे.