मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  पुणे, सातारा, नाशिकसह राज्यात तापमान खालावलं; तापमानात घट झाल्यानं थंडी वाढली, शेकोट्या पेटल्या!

पुणे, सातारा, नाशिकसह राज्यात तापमान खालावलं; तापमानात घट झाल्यानं थंडी वाढली, शेकोट्या पेटल्या!

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Nov 20, 2022 11:30 AM IST

Maharashtra Winter Update : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये तापमानात घट झाली आहे. याशिवाय थंडीचा जोर वाढल्यानं शेकोट्या पेटल्या आहेत.

Maharashtra Winter Update
Maharashtra Winter Update (HT)

Maharashtra Winter Update : हिवाळा सुरू होऊन दीड महिन्यांचा कालावधी लोटलेला असताना महाराष्ट्रात फारशी थंडी पडली नव्हती. परंतु आता गेल्या आठवडाभरापासून राज्यातील अनेक जिल्ह्यांतील तापमानात घट झाली असून कडाक्याची थंडी पडू लागली आहे. त्यामुळं सकाळी थंडीपासून बचाव करण्यासाठी ग्रामीण भागात अनेक ठिकाणी लोक शेकोट्या पेटवत आहेत. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद आणि नागपूरात थंडीच्या प्रमाणात वाढ झाली आहे.

२०२२ या वर्षात पहिल्यांदाच पुणे जिल्हात तापमानाचा पारा १० अंशाखाली आला आहे. याशिवाय ९.५ अंश सेल्सिअस इतकं तापमान पुणे शहराचं नोंदवण्यात आल्यानं पुणेकरांनी कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्यासाठी स्वेटर्स, जॅकेट आणि कानटोप्या कपाटातून बाहेर काढल्या आहेत.

मराठवाड्यात सर्वात कमी तापमान परभणीत...

मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानात घट होत असून विभागामध्ये सर्वात कमी तापमान हे परभणी जिल्ह्यात नोंदवण्यात आलं आहे. परभणीत तापमानाचा पारा ८.३ अंशावर पोहचल्यानं नागरिकांनी उबदार कपडे घालायला सुरुवात केली आहे. याशिवाय औरंगाबाद, जालना, हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्ह्यांमध्येही थंडीचा जोर वाढल्याचं चित्र आहे.

वेण्णालेक आणि महाबळेश्वरात निचांकी तापमानाची नोंद...

थंड हवेचं ठिकाण म्हणून ओळखल्या जाणारं साताऱ्यातील महाबळेश्वर आणि वेण्णालेकमध्ये तापमानात मोठी घट झाली आहे. महाबळेश्वरमध्ये आठ आणि वेण्णालेकमध्ये सहा अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. याशिवाय कोल्हापूर आणि साताऱ्यासह आणि सोलापूरातही तापमान खालावलं आहे. याशिवाय उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे आणि अहमदनगर जिल्ह्यांतही थंडीचा जोर वाढला आहे.

ग्रामीण भागांत शेकोट्या पेटल्या...

राज्यात कडाक्याची थंडी पडत असल्यानं ग्रामीण भागासह शहरी भागांतही शेकोट्या पेटल्याचं पाहायला मिळत आहे. याशिवाय थंडीपासून बचाव करण्यासाठी लोक उबदार कपडे घालत असून सकाळी गरमागरम चहा प्यायला पसंती देत आहेत. त्यामुळं आता राज्यात बदललेलं वातावरण पुढील किती दिवस राहणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

IPL_Entry_Point