महाराष्ट्रात एक अशी घटना समोर आली आहे, ज्यात एका महिलेने सासरच्या लोकांवर दाताने चावल्याचा आरोप केला आहे. मानवी दात हे धोकादायक शस्त्र मानले जाऊ शकत नाही, ज्यामुळे गंभीर नुकसान होण्याची शक्यता नाही, असे सांगत मुंबई उच्च न्यायालयाने सासरच्यांविरोधात एका महिलेने दाखल केलेला एफआयआर रद्द बातल ठरवला आहे.
उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती विभा कंकणवाडी आणि न्यायमूर्ती संजय देशमुख यांच्या औरंगाबाद खंडपीठाने ४ एप्रिल रोजी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, तक्रारदाराच्या वैद्यकीय प्रमाणपत्रात दातांच्या खुणांमुळे त्यांना किरकोळ जखम झाल्याचे दिसून आले आहे. या दुखापतीच्या आधारे महिलेने एप्रिल २०२० मध्ये एफआयआर दाखल केला.
पोलिस ठाण्यात दाखल एफआयआरनुसार, सासरच्या मंडळींशी झालेल्या भांडणादरम्यान एका नातेवाईकाने महिलेला चावल्याने ती जखमी झाली होती. महिलेच्या तक्रारीवरून आरोपींवर भारतीय दंड संहितेनुसार इजा पोहोचवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मानवी दात हे धोकादायक शस्त्र म्हणता येणार नाही, असे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे. न्यायालयाने आरोपींनी दाखल केलेली याचिका मान्य करत खटला फेटाळून लावला. या प्रकरणातील तक्रारदाराच्या वैद्यकीय प्रमाणपत्रावरून दातांमुळे केवळ साध्या जखमा झाल्याचे दिसून आल्याचे न्यायालयाने नमूद केले. त्यामुळे येथे कलम ३२४ अन्वये गुन्हा होत नाही. अशा वेळी सासरच्या किंवा आरोपींवर खटला चालवणे हा कायदेशीर प्रक्रियेचा गैरवापर ठरेल. दोन्ही पक्षांमध्ये मालमत्तेचा वाद असल्याचे कोर्टाकडून सांगण्यात आले.
भारतीय दंड संहितेच्या कलम ३२४ (धोकादायक शस्त्राने स्वेच्छेने इजा पोहोचविणे) अन्वये, इजा एखाद्या उपकरणाद्वारे केली जाणे आवश्यक आहे ज्यामुळे मृत्यू किंवा गंभीर दुखापत होण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या