शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर भोयर यांचा भाजप प्रवेश
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर भोयर यांचा भाजप प्रवेश

शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर भोयर यांचा भाजप प्रवेश

HT Marathi Desk HT Marathi
Updated Mar 12, 2025 11:04 AM IST

‘शिक्षक महासंघा’चे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर भोयर यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

शिक्षक महासंघाचे चंद्रशेखर भोयर यांचा भाजप प्रवेश
शिक्षक महासंघाचे चंद्रशेखर भोयर यांचा भाजप प्रवेश

‘शिक्षक महासंघा’चे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर भोयर यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि माजी मंत्री, आमदार संजय कुटे यांच्या उपस्थितीत भोयर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भोयर यांनी २०२० साली अमरावती विभाग शिक्षक मतदार संघची निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना दुसऱ्या क्रमांकाची ८ हजार मते मिळाली होती. भोयर यांनी शिक्षण क्षेत्र तसेच शिक्षकांसाठी भरपूर काम केले असून त्यांच्या भाजपमधील प्रवेशामुळे पक्षाचे संघटन वाढणार असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. 

शिक्षण क्षेत्र आणि शिक्षकांच्या निगडित समस्यांची उत्तम जाण असलेल्या चंद्रशेखर भोयर यांनी कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना ‘शिक्षक महासंघा’ची स्थापना केली होती. शिक्षकांची मोट बांधून त्यांनी शिक्षकांच्या अनेक समस्या मार्गी लावल्या होत्या. भोयर यांनी २०१४ आणि २०२० साली अमरावती शिक्षक मतदारसंघातून आमदारकीची निवडणूक लढविली होती. भोयर यांच्यासोबत शिक्षक महासंघाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी यावेळी भाजपमध्ये प्रवेश केला. यापुढे शिक्षण क्षेत्रात भाजप पक्षाचे संघटन वाढवण्याचे आपले ध्येय असल्याचे चंद्रशेखर भोयर यांनी सांगितले. भाजप सदस्य नोंदणी मोठ्या प्रमाणात वाढवणार असल्याचे ते म्हणाले.

नोव्हेंबर २०२६ मध्ये शिक्षक मतदार संघ निवडणुकीचा रणसंग्राम सुरू होत असून अमरावती शिक्षक मतदारसंघातून चंद्रशेखर भोयर हे पुन्हा एकदा शिक्षकांच्या आग्रहाखातर निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे. 

चंद्रशेखर भोयर हे गेल्या २५ वर्षापासून शिक्षक महासंघाच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. विविध आंदोलने करून वेळप्रसंगी इतर संघटनांच्या आंदोलनात सहभागी होऊन भोयर यांनी शिक्षकांच्या मागणीसाठी आवाज बुलंद केला आहे. याद्वारे त्यांनी शिक्षकांच्या अनेक समस्याही मार्गी लावल्या आहेत. 

या कार्यक्रमात तिवसाचे आमदार राजेश वानखेडे, माजी राज्यमंत्री प्रविण पोटे, अचलपूरचे आमदार प्रविण तायडे, धामणगावचे आमदार प्रताप अडसड, मेळघाटचे आमदार केवलराम काळे,मोर्शीचे आमदार उमेश यावलकर आणि प्रदेश उपाध्यक्ष अनिल गावंडे उपस्थित होते.

Whats_app_banner

संबंधित बातम्या