Ulhasnagar Crime : राज्यात मुलींवरील अत्याचार थांबण्याचे नाव घेत नाही. बदलापूर येथील एका शाळेत दोन मुलींवर अत्याचार झाल्याची घटना ताजी असतांना आता उल्हासनगरमध्ये अशीच एक घटना उघडकीस आली आहे. या शाळेतील पीटी शिक्षकाने शाळेतील ७ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी नराधम शिक्षकाला अटक करण्यात आली आहे.
राज्यात बदलापूर येथील घटना घडल्यावर मोठ्या प्रमाणात जनक्षोभ झाला होता. नागरिकांनी बदलापूर बंद करत हिंसक आंदोलन केले होते. या घटनेनंतर देखील राज्यात महिला आणि मुलींवरील अत्याचार सुरूच आहेत. उल्हासनगर येथील एका शाळेत एका शिक्षकाने शाळेतील एका मुलीवर अत्याचार केल्याचं उघड झालं आहे. पीडित मुलीने ही बाब घरी सांगितल्यावर तिच्या पालकांनी शिक्षकाविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दिली. यानंतर या शिक्षकाला अटक करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी उल्हासनगर हिल लाईन पोलीस पुढील तपास करत आहेत.
आरोपी पि.टी. शिक्षकाने ७ वर्षीय मुलीला 'मला मिठी मार, माझी पप्पी घे नाहीतर तुला मारेल...' अशी धमकी दिली. आरोपीने इतक्यावर न थांबता मुलीच्या गालावर चुंबन घेऊन तिचा विनयभंग केला. ही बाब मुलीने घरी सांगितली. यानंतर पालकांनी मुलीसोबत जात पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी पीडित मुलीच्या तक्रारीनंतर पि.टी. शिक्षकाला अटक केली.
तर रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात देखील ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर खाऊचे आमिष दाखवून अत्याचार करण्यात आल्याची दुसरी घटना उघडकीस आली आहे. एका ५० वर्षीय व्यक्तीने एका ११ वर्षांच्या मुलीला खाऊचे आमिष दाखवले. यानंतर तिच्यावर त्याने अत्याचार केले. मारुती बाईत असे आरोपीचे नाव आहे. ही घटना मे महिन्यात घडली होती, मात्र आरोपीने तिला मारण्याची धमकी दिल्याने ही घटना तिने कुणाला सांगितली नव्हती.
मात्र, मुलीला त्रास होऊ लागल्याने मुलीच्या घरच्यांनी तिला दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी तिची तपासणी केल्यावर तिच्यावर अत्याचार झाल्याचं उघडं झालं. मुलीच्या पालकांनी तिला विश्वासात घेत तिला विचारल्यावर तिने तिच्यावर बेतलेल्या प्रसंग कथन केला. यानंतर पालकांनी पोलिस ठाण्यात धाव घेत नराधम आरोपी विरोधात पोलिसांत तक्रार दिली. यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. पुढील तपास रायगड पोलिस करत आहेत.