मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Lift Accident In Malad : लिफ्टमध्ये अडकल्यानं शिक्षिकेचा मृत्यू; धक्कादायक घटनेनं मालाडमध्ये खळबळ

Lift Accident In Malad : लिफ्टमध्ये अडकल्यानं शिक्षिकेचा मृत्यू; धक्कादायक घटनेनं मालाडमध्ये खळबळ

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Sep 17, 2022 10:00 AM IST

Lift Accident In Malad : एका वर्गातील तासिक संपवून शिक्षिका सहाव्या मजल्यावरून खाली दुसऱ्या मजल्यावर येत होत्या. परंतु दरवाजा न लागताच लिफ्ट सुरू झाली आणि मोठा अनर्थ घडला.

Lift Accident In Malad
Lift Accident In Malad (HT)

St. Mary's English School Malad Mumbai : एका वर्गातील तास संपवल्यानंतर दुसऱ्या वर्गात जाण्यासाठी निघालेल्या शिक्षिकेचा शाळेतील लिफ्टमध्ये अडकून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळं मुंबईत खळबळ उडाली असून या घटनेमुळं शाळेतील विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा उपस्थित झाला आहे. जेनेली फर्नांडिस असं मृत शिक्षिकेचं नाव असून त्या मालाडमधील सेंट मेरी इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षिका म्हणून त्या कार्यरत होत्या.

मिळालेल्या माहितीनुसार, मालाडमधील सेंट मेरी इंग्लिश स्कूलमधील शिक्षिका जेनेली फर्नांडिस यांनी सहाव्या मजल्यावरील एका वर्गाचा तास संपवून त्या दुसऱ्या मजल्यावरील वर्गाचा तास घेण्यासाठी निघाल्या. त्यावेळी त्यांनी पायऱ्यांनी खाली न उतरता लिफ्टचा वापर करायचं ठरवलं. लिफ्टमध्ये फर्नांडिस आत गेल्या परंतु दरवाजा बंद होण्याआधीच लिफ्ट सुरू झाली. त्यामुळं या दुर्घटनेत फर्नांडिस या गंभीर जखमी झाल्या. हा प्रकार शाळेतील विद्यार्थ्यांना लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरड करायला सुरुवात केली.

त्यानंतर शाळेतील स्टाफ आणि सुरक्षा रक्षकांनी तातडीनं लिफ्टच्या दिशेनं धाव घेतली. फर्नांडिस यांना लिफ्टच्या बाहेर काढलं तेव्हा त्यांना गंभीर मार लागलेला होता. त्यानंतर त्यांना उपचारासाठी लाईफलाईन रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु डॉक्टरांनी त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना मृत घोषित केलं.

या प्रकरणात आता मालाड पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून पोलिसांकडून लिफ्टची देखभाल करणाऱ्या कंपनीची चौकशी होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात खरंच लिफ्टमध्ये तांत्रिक बिघाड झाला की कुणाचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे?, याची चौकशी होण्याची शक्यता आहे.

WhatsApp channel