रेल्वेची माणुसकी! धावत्या रेल्वेतून पडलेल्या प्रवाशाच्या मदतीसाठी तब्बल १ किमी उलटी धावली ट्रेन
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  रेल्वेची माणुसकी! धावत्या रेल्वेतून पडलेल्या प्रवाशाच्या मदतीसाठी तब्बल १ किमी उलटी धावली ट्रेन

रेल्वेची माणुसकी! धावत्या रेल्वेतून पडलेल्या प्रवाशाच्या मदतीसाठी तब्बल १ किमी उलटी धावली ट्रेन

Jan 06, 2025 03:01 PM IST

Indian Railway News : रेल्वेतून एक प्रवासी खाली पडल्याने त्याच्या मदतीसाठी तब्बल १ किमीपर्यंत रेल्वे उलटी धावल्याची घटना शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास घडली.

रेल्वेची माणुसकी! धावत्या रेल्वेतून पडलेल्या प्रवाशाच्या मदतीसाठी तब्बल १ किमी उलटी धावली ट्रेन
रेल्वेची माणुसकी! धावत्या रेल्वेतून पडलेल्या प्रवाशाच्या मदतीसाठी तब्बल १ किमी उलटी धावली ट्रेन

Indian Railway News : भारतीय रेल्वेने शनिवारी माणुसकीचे अनोखे दर्शन घडवले.  धावत्या गाडीतून खाली पडलेल्या प्रवाशाच्या मदतीला तब्बल १ किमी पर्यंत ट्रेन ही उलट्या दिशेने धावली. ही घटना महाराष्ट्रातील मनमाड येथे घडली आहे.  मात्र, ज्या प्रवाशाच्या मदतीसाठी ही ट्रेन उलटी धावली तसेच अनेक गाड्यांना उशीर झाला,  त्या प्रवाशाचा उपचार सुरू असतांना मृत्यू झाला. तपोवन एक्सप्रेसमध्ये हा प्रकार घडला.  

काय आहे घटना ? 

मिळालेल्या माहितीनुसार धावत्या तपोवन एक्सप्रेसच्या एका कोचमधून शनिवारी एक प्रवासी कोचमधून खाली पडला. ही घटना मनमाड रेल्वेस्थानका जवळ घडली. या खाली पडलेल्या  प्रवाशाचे नाव सरवर शेख  (वय ३०) असे आहे. तो मूळचा उत्तर प्रदेशचा आहे.  तपोवन एक्स्प्रेस गाडी मनमाड जंक्शनवर आल्यानंतर तो डब्यातून खाली कोसळला. विभागीय रेल्वे व्यवस्थापक इति पांडे यांनी या बाबत माहिती देतांना सांगितले की,  'रेल्वेच्या लोको पायलटने नियंत्रकाकडून परवानगी घेऊन जखमी प्रवाशाला उचलण्यासाठी गाडी तब्बल १ किमी उलट्या दिशेने पुन्हा आणली.  

 शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास हा प्रकार घडला. ही घटना घडल्यावर  एका प्रवाशाने आपत्कालीन साखळी खेचली होती. तिसऱ्या डब्यातून एक तरुण खाली पडल्याची माहिती रेल्वे गार्ड एस. एस. कदम यांना प्रवाशांकडून मिळाली. कदम यांनी लोको पायलट एम. एस. आलम यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर आलम यांनी नियंत्रकांशी संपर्क साधून परत जाण्याची परवानगी मागितली. 

त्यानंतर तपोवन एक्स्प्रेसच्या मागे येणारी मालगाडी एका स्थानकावर अगोदरच थांबविण्यात आली, जेणेकरून गाडीसाठी जागा उपलब्ध होऊ शकेल. रेल्वेत उपस्थित प्रवाशांच्या मदतीने शेखचा शोध घेण्यात आला आणि त्यानंतर गाडी मनमाड स्थानकात पोहोचली. तोपर्यंत रेल्वे प्रशासनाने शेख यांना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था केली होती. रुग्णालयात नेल्यानंतर गाडी नांदेडकडे रवाना झाली. दरम्यान, या प्रवाशावर उपचार सुरू करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतांना या प्रवाशाचा मृत्यू झाला. ज्या प्रवाशासाठी रेल्वेने एवढी धडपड केली, त्या प्रवाशाचा जीव वाचू न शकल्याने सर्वांनी हलहळ व्यक्त केली. 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर